मोहनीराज लहाडे लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर: सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डीचे साईबाबा ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देतात. मात्र राजकीय नेते या संदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघ सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी गाजत राहतो. अलीकडेच त्याला कारण ठरला आहे तो शिवसेनेच्या ठाकरे गटातील गोंधळ. या गोंधळाने ठाकरे गटाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार बदलल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेतील निर्णय पूर्वी बिनबोभाट स्वीकारले जायचे. आता त्याविरुद्ध आवाज उठवले जातात.

शिवसेनेतील फुटीनंतर हे आवाज अधिक बुलंदपणे काढले जातात. शिर्डीतही त्याचा प्रत्यय येत आहे. शिवसेना सोडून गेलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची शिवसैनिकांनी ‘गद्दार’ म्हणून संभावना केली, त्याच शिवसैनिकांना पुन्हा वाकचौरे यांना स्वीकारण्याची वेळ आली. वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीने अस्वस्थ झालेल्या इच्छुक बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा व शिर्डीच्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्याबरोबर निवडणुकीसाठी ऐनवेळी उमेदवारी लादण्याची परंपराही कायम राखली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-पालघर भाजपमधील हेवेदावे मिटेनात

शिर्डीत पूर्वी शिवसेनेचा उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या रूपाने सलग दुसऱ्यांदा विजयी झाला होता. लोखंडे यांना शिवसेनेकडून ऐनवेळी उमेदवारी मिळाली होती. लोखंडेपूर्वी भाजपमध्ये होते, नंतर ते मनसेमध्ये गेले. त्यावेळीही नाशिकचे बबनराव घोलप यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली होती. नंतर त्यांच्या शिक्षेचे प्रकरण उद्भवले. त्यामुळे उमेदवारी रद्द झाली. त्यांनी चिरंजीवांसाठीही प्रयत्न केले, मात्र ऐनवेळी उमेदवारी सदाशिव लोखंडे यांनी मिळवली आणि ते निवडूनही आले होते.

शिवसेनेतील फुटीनंतर खासदार लोखंडे शिंदे गटाकडे गेले. त्यामुळे शिवसेनेकडे उमेदवारीचा पेच निर्माण झाला. नाशिकचे बबनराव घोलप पुन्हा शिर्डीत सक्रिय झाले. शिवसेनेपुढे उमेदवारीसाठी दुसरे नावच नव्हते. त्यातून त्यांच्याकडे ठाकरे गटाचे, शिर्डीचे संपर्कप्रमुख पदही गेले. त्यांचे संपर्कप्रमुख पदही स्थानिक शिवसैनिकांनी सहजासहजी स्वीकारले नाही. मात्र घोलप संभाव्य उमेदवार म्हणून मतदारसंघात फिरू लागले होते.

आणखी वाचा-अकोल्यात कावड आणि पालखी महोत्सवातून मतांची पेरणी

त्यापूर्वी सन २००९ मध्ये भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेचे खासदार होते. तेही असेच ऐनवेळी शिवसेनेचे उमेदवार ठरले होते. त्यावेळी त्यांची लढत सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबरोबर झाली. त्यावेळचा प्रचार आणि आठवले यांचा पराभव देशभर गाजला. आठवले यांच्या राज्यसभेची मुदत सन २०२६ पर्यंत आहे. मात्र ते अधूनमधून आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचे मत प्रदर्शित करत आपला हक्क कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. नंतर भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे यांची साथ पकडत भाऊसाहेब वाकचौरे भाजपमध्येही गेले.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळाचे निमित्त शोधत गेल्या आठवड्यात शिर्डीचा दौरा केला. नगर जिल्ह्यात टंचाईसदृश्य परिस्थिती आहे. शिर्डी मतदारसंघ ज्या जिल्ह्याच्या उत्तर भागात येतो त्यापेक्षा टंचाईची तीव्रता जिल्ह्याच्या दक्षिण भागात अधिक आहे. मात्र दक्षिणेत न जाता ठाकरे उत्तर भागात गेले. शिवसेना फुटीनंतर प्रथमच ते शिर्डी मतदारसंघात आले होते. तत्पूर्वी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्षप्रवेश घडवण्यात आला. दौऱ्यातही वाकचौरे यांना ठाकरे यांच्या बरोबरीने उपस्थित होते. ही बाब बबनराव घोलप यांना खटकली. आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला गेला असताना वाकचौरे यांना पुढे केले जात आहे, याला हरकत घेत त्यांनी लगेच गाजावाजा करत उपनेतेपद आणि संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला. ठाकरे यांच्या दौऱ्याला लागूनच या लगेचच घडलेल्या घडामोडी आहेत. त्यामुळे हा दौरा दुष्काळासाठी होता की पूर्वनियोजित होता असाही प्रश्न केला जातो.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. मात्र या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघावर साखर कारखानदार परिसरातील सहकारी संस्थांवर वर्चस्व ठेवून आहेत. आपल्या संस्था, कार्यक्षेत्रात इतरांचा हस्तक्षेप ते सहन करत नाहीत. आजी-माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (भाजप) व बाळासाहेब थोरात (काँग्रेस) या दोन दिग्गज नेत्यांचा याच मतदारसंघात समावेश होतो. शिर्डीतील उमेदवारीवर प्रभाव पाडणारा हा घटक आहे. सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी हे पथ्य पाळले. त्यापूर्वी वाकचौरे हेही त्याच मार्गावरून गेले होते. ठाकरे गटाला घोलप यांच्याबद्दल ही शाश्वती वाटत नसावी.