पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात स्पर्धेक असलेल्या आणि राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सातत्याने कुरघोडीचे राजकारण सुरू असते. त्यातच आता राष्ट्रवादीने पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष हे पद दिल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या पदाच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’ पुन्हा शहरात वर्चस्व वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याने भविष्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसचे नेते दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहराची सूत्रे आली. सलग १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेवर होती. अजित पवार यांच्या कलानेच शहरातील संपूर्ण निर्णय होत असे. २०१७ मध्ये भाजपने अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला. महापालिकेतील सत्ता भाजपने खेचून घेतली. महापालिकेत सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडला मंत्रीपद देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. परंतु, मंत्रीपद मिळाले नाही. जुन्या कार्यकर्त्यांना पदे देऊन न्याय देण्याची भूमिका भाजपने स्वीकारली. अमर साबळे यांना राज्यसभा, सचिन पटवर्धन यांना लोक लेखा समिती, सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. उमा खापरे, अमित गोरखे यांना विधानपरिषदेवर घेत पाठबळ दिले. बेरजेचे राजकारण केले. शहरात भाजपचे चार आमदार असून भाजप सर्वात मोठा पक्ष झाला.
अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरील संघर्ष कमी झालेला नाही. त्याउलट त्यात वाढ झाली. भाजपला रोखण्यासाठी शहर राष्ट्रवादीने एकमेव आमदार असलेल्या बनसोडे यांना मंत्रीपद आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी केली होती. परंतु, मंत्रीपदाऐवजी विधानसभेचे उपाध्यक्ष हे संवैधानिक पद आमदार बनसोडे यांना देण्यात आले. त्यामुळे बनसोडे यांचे सत्ताकेंद्र शहरात होणार आहे. बनसोडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी महापालिकेतील कामे करुन घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष पद शहराला देऊन अजित पवार यांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच संघटना वाढविण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांची नाराजी लपून राहिली नाही. जाहीर कार्यक्रमातूनही त्यांचा पवार यांच्याशी असलेला संघर्ष उघडपणे दिसून आला आहे. लांडगे हे अजित पवार यांचे नाव घेण्याचेही टाळतात. मंत्रीपदाची मागणी करुनही ते मिळत नसल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. आमदार लांडगे, आमदार शंकर जगताप यांना मंत्रीपदाऐवजी विधिमंडळाच्या विविध समित्यांचे सदस्यपद दिले आहे. अजित पवार यांनी बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद दिले. त्यातून राष्ट्रवादीकडून शहरात भाजपवर कुरघोडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खासदार सुनेत्रा पवारही पिंपरीत सक्रिय
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यानंतर आता राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनीही पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात लक्ष घातले आहे. खासदार पवार यांनी नुकतीच महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेतली. पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी निधी द्यावा, प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना त्यांनी आयुक्तांना केल्या. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पवार कुटुंबातील तीन सदस्य पिंपरीत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत भाजपचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, ‘आमदार अण्णा बनसोडे हे महायुतीचे आहेत. त्यांच्या पदाचा शहराच्या विकासासाठी फायदा होईल. शहरात भाजपचे चार आमदार आहेत. त्यापैकी एखाद्या आमदाराला मंत्रीपद देण्याची मागणी नेतृत्वाकडे केली आहे. कोणीही नाराज नाही.’