अलिबाग : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची दोन दिवसीय जनसंवाद यात्रा रायगड जिल्ह्यात पार पडली. या यात्रे दरम्यान चार विधानसभा मतदारसंघात सहा सभा घेत, आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांचा नारळ फोडला. पक्षांतर्गत बंडखोरी आणि संघटनात्मक फुटीमुळे आलेली कार्यकर्त्यामधील मरगळ दूर करण्यात या दौऱ्यामुळे यशस्वी झालेच. पण राजकीय परिस्थितीमुळे असुरक्षितेची भावना मनात असेलल्या मुस्लिम समाजाचे लक्ष शिवसेनेकडे वेधण्यात ते यशस्वी झाले. कडवट हिंदूत्वाचा त्यागकरून राष्ट्रीयत्वाकडे शिवसेनेची वाटचाल सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. मात्र त्याच वेळी दौऱ्यात इंडीया आघाडीला फारसे स्थान दिल्याचे दिसून आले नाही.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली. रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, रोहा, पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव या सहा ठिकाणी त्यांनी दोन दिवसात सभा घेतल्या. सर्वच सभांना उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे या निमित्ताने दिसून आले.
हेही वाचा : राज्यमंत्री कपिल पाटील यांचा दिल्लीचा मार्ग यंदा खडतर ?
पक्षांतर्गत बंडखोरीमुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना संघटनेची मोठी वाताहत झाली होती. पक्षाचे तीन्ही आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी पक्षाला सोडून गेल्याने संघटनेची ताकद कमी झाली होती. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना जिवंत ठेवली असली तरी संघटनेत कमालीची मरगळ दिसून येत होती. ही मरगळ उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यामुळे दूर झाली. जनसंवाद दौऱ्यामुळे कार्यकर्ते आणि संघटनेत चैतन्य निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने जनाधार गमावलेला नाही याचा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला.
कडवट हिंदूत्वाचा त्यागकरून शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रीयत्वाकडे वाटचाल सरू केल्याचे या निमित्ताने दिसून आले. मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या प्रवाहात जोडण्याचा प्रयत्न जनवसंवाद दौऱ्या दरम्यान करण्यात आला. यात बऱ्याच प्रमाणात ते यशस्वी झाले. रोहा, म्हसळा आणि माणगाव येथे झालेल्या सभांना मुस्लिम समाजाने चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपशी जुळवून घेतल्यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाजात नाराजी होती, त्यांच्या असुरक्षिततेची भावना होती. हीबाब ठाकरे यांनी अचूक हेरली. आपल्या प्रत्येक भाषणात त्यांनी मुस्लिम समजाला साद घालण्याचा प्रय़त्न केला. मोर्बा, म्हसळा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे उत्फुर्त स्वागत केले गेले. मराठी भाषेतील कुराणाची प्रत त्यांना भेट म्हणून देण्यात आली. त्यामुळे मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या प्रवाहाशी जोडण्यात यशस्वी ठरल्याच या निमित्ताने दिसून आले.
हेही वाचा : झारखंड राज्यनिर्मिती चळवळीतील कार्यकर्ता ते मुख्यमंत्री; कोण आहेत चंपई सोरेन?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर थेट आणि आक्रमक शाब्दीक हल्ले चढवले, स्थानिक मुद्द्याबरोबर राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजप आणि मोदी यांना घेरण्याचा प्रय़त्न केला. विकासकामांच्या उद्घाटनासाठी वरचेवर महाराष्ट्रात येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते आणि निसर्ग वादळांच्या आपत्ती काळात फिरकले नसल्याचे सांगत त्यांनी कठीण काळात शिवसेनाच मदतीला धावून आल्याचे सांगितले. पक्ष, चिन्ह, आणि नेते हिरावून घेतले पण पध्दतीने आक्रमकपणे निवडणूकीच्या रिंगणात उतरायला हवे याची झलक त्यांनी या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने दाखवून दिली. राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ आणि भाजपच्या मुळ कार्यकर्त्यांना त्यांनी भावनिक साद घालण्याचा प्रय़त्न केला.
हेही वाचा : “तामिळनाडूमध्ये सीएए कधीही लागू होऊ देणार नाही”, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे मोठे विधान
पण त्याच वेळी ठाकरे यांनी संपुर्ण दौऱ्यात त्यांनी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना फारसे महत्व दिल्याचे दिसून आले नाही. जाहीर सभांमधेही इंडीया आघाडीच्या घटक पक्षांना स्थान देण्यात आले नाही. तर सभांना संबोधित करताना ठाकरे यांच्याकडून इंडीया आघाडीचा उल्लेख केला गेला नाही. मोदींवर टीकास्त्र सोडतांनाच राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भलावण केली नाही. एकूणच दोन दिवसांच्या जनसंवाद दौऱ्यात पक्षसंघटनेला नवचैतन्य देण्यात उध्दव ठाकरे यशस्वी ठरले आहेत. मात्र या दौऱ्याचा मतदारांवर किती प्रभाव पडला हे आगामी निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.