तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी शनिवारी (दि. २६ ऑगस्ट) इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेवर भाष्य करत असताना भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली. भाजपाची भक्त आणि ट्रोल आर्मी इस्रोच्या यशाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरत असल्याचे त्या म्हणाल्या. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (आधी ट्विटर) त्यांनी आपली भूमिका मांडली. इस्रोच्या प्रत्येक मोहिमेला आता भाजपाकडून प्रचारासाठी वापरले जात आहे. प्रत्येक मोहिमेशी राष्ट्रवादाची सांगड घालून त्याला निवडणुकीचा मुद्दा बनविण्याची चढाओढ लागलेली दिसते.
त्यानंतर मोईत्रा यांनी भक्त आणि ट्रोल आर्मीवर आरोप केला. इस्रोचे श्रेय मोदींच्या नावावर खपविण्यासाठी ट्रोल आर्मी दिवसरात्र मेहनत घेत असून ‘मोदी है तो, मुमकीन है’ अशी जाहीरातबाजी त्यांच्याकडून करण्यात येत आहे, अशी टीका त्यांनी केली.
बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश बनला. १५ व्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यास हजेरी लावली. चांद्रयान-३ चे लँडिंग होताच इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ही आनंदवार्ता संपूर्ण देशाला दिली आणि त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचे आभार मानले.
मोईत्रा यांनी आणखी एक ट्विट केले. त्यात म्हटले, “इस्रोचे लँडर चंद्रावर उतरले आहे आणि इस्रोने हे पहिल्यांदा नाही केले. आम्ही भाजपाला आठवण करू देऊ इच्छितो की, नरेंद्र मोदी हे चंद्रावर गेलेले नाहीत किंवा भाजपा आयटी सेलने चांद्रयानसाठी काही संशोधन केलेले नाही. एवढेच आम्हाला म्हणायचे आहे”.
शनिवारी (दि. २६ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसचा दौरा संपवून थेट बंगळुरू येथे चांद्रयान ३ साठी काम करणाऱ्या इस्रोच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. हिंदुस्तान एरोस्पेस लिमिटेड येथील विमानतळावर लोकांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “चांद्रयान-३ चंद्रावर लँड होताच मला खूपच आनंद झाला. मी त्यावेळी भारतात नव्हतो. त्यामुळेच भारतात गेल्यानंतर सर्वात आधी बंगळुरू येथे जाऊन इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटावे, असे मी ठरवले.”
यू आर राव उपग्रह केंद्र (URSC) येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ निधी पोरवाल यांनी पंतप्रधानांची भेट झाल्यावर म्हटले की, पंतप्रधान मोदी इस्रो कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्या पुढे म्हणाल्या, “हा एक चमत्कार आहे, जो आमच्या डोळ्यासमोर घडला. ही मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी आम्ही अनेक काळापासून अविरत झटत होतो. चांद्रयानाचे चंद्रावर लँडिग व्हावे, यासाठी मागच्या चार वर्षांपासून वैज्ञानिकांचा चमू अहोरात्र काम करत होता. जेव्हा तुमचा कुटुंबप्रमुख (पंतप्रधान मोदी) तुमची भेट घेण्यासाठी येतो, तेव्हा खूप आनंद होतो. अंतराळ विभाग हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आहे. त्यांनी आमच्याशी साधलेला संवाद आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आनंद देणारा आहे.”