मुंबई : खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या संख्येवरून महायुतीमध्ये पेच असून आता तो नवी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींबरोबर होणाऱ्या बैठकीतच सुटणार आहे. मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे बुधवारी दुपारी नवी दिल्लीला जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेनंतरच खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपने शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप घेतला असून शिंदे यांना गृह व महसूल खाते देण्यास नकार दिला आहे. मात्र शिंदे अजूनही गृह, महसूल व गेल्या मंत्रिमंडळातील खात्यांसाठी आग्रही असल्याने खातेवाटपाचा पेच सुटलेला नाही. शहा यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेत मार्ग निघाला, तर शुक्रवार किंवा शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अन्यथा तो नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतरच करावा लागेल.

आणखी वाचा-अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?

खातेवाटप करून मंत्रिमंडळ विस्तार शनिवारपर्यंत मार्गी लावण्याचे फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी गेल्या गुरूवारी होऊनही आठवडाभरात खातेवाटप न झाल्याने आणि मंत्रिमंडळ विस्तारही मार्गी लागत नसल्याने महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे यांनी गृहसह गेल्या मंत्रिमंडळातील खात्यांचा आग्रह कायम ठेवल्याने खातेवाटपाची चर्चा पुढे सरकली नव्हती. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांची मंगळवारी ठाणे निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. फडणवीस यांनीही शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. पण मार्ग न निघाल्याने दिल्लीला जाऊन भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याचे तीनही नेत्यांनी ठरविले. फडणवीस, शिंदे व पवार हे दिल्लीला जाऊन शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र खातेवाटप व विस्तार यासाठी ही दिल्लीवारी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?

शिवसेनेतील संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत अशा काही ने त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपचा आक्षेप आहे. शिवसेनेतील मंत्र्यांची नावे, संख्या व खाती भाजपनेच ठरविण्याच्या मुद्द्याला शिंदे यांची हरकत आहे. काही नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात न केल्यास शिंदे यांची अडचण होणार आहे. सध्या केवळ प्रत्येकी सात-आठ मंत्र्यांचाच समावेश विस्तारात करावा व छोटेखानी मंत्रिमंडळ असावे, असा प्रस्ताव फडणवीस यांनी ठेवला आहे. शिंदे व पवार यांच्या पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असून कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न शिंदे व पवार यांच्यापुढे आहे. फडणवीस यांनाही मोजक्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळातील करावा लागणार असल्याने ज्येष्ठांना संधी द्यायची, की नवीन चेहऱ्यांना, हा प्रश्न आहे. त्यामुळे या पेचातून भाजप पक्षश्रेष्ठींकडून तोडगा काढला गेल्यास दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सूत्रांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue of ministry post between devendra fadnavis eknath shinde and ajit pawar is likely to be resolved in delhi print politics news mrj