मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील निघालेला मोर्चा, त्याच वेळी त्यांच्या निकटवर्तीयांच्या विरोधात सुरू झालेली कारवाई, जुने निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश करताना दिशा सॅलियन मृत्यूची चौकशी करण्याची केलेली मागणी, भाजपकडून सातत्याने केला जाणार हल्ला यावरून भविष्यात आदित्य ठाकरे हे भाजप आणि शिंदे गटाचे लक्ष्य असतील हेच स्पष्ट होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाचे मुंबई, ठाण्यातील वर्चस्व मोडून काढण्यावर शिंदे व भाजपने भर दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षाची सूत्रे शिंदे यांच्याकडे गेली असली तरी शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग अद्यापही ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सर्वेक्षणात आढ‌‌ळले आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता ठाकरे गटाची पुरती कोंडी करण्याची भाजप आणि शिंदे गटाची योजना आहे. यातूनच मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ठाकरे यांना शह देण्याकरिता आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केले जात आहे.

हेही वाचा – आम आदमी पक्षाचा समान नागरी कायद्याला तत्वतः पाठिंबा; ‘आप’च्या भूमिकेमुळे विरोधकांच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

आदित्य ठाकरे यांची कोंडी करून ठाकरे गटाला नामोहरम करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसतो. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण सध्या ईडीच्या रडारवर आहेत. राहुल कनाल यांनी मागणी केल्याप्रमाणे दिशा सॅलियन हिच्या मृत्यूची फेरचौकशी करून आदित्य यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कनाल हा शिंदे किंवा भाजप नेत्यांनी भरविल्याशिवाय बोलणार नाही, असे ठाकरे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मोर्चाच्या वेळी भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी सत्तेत आल्यावर विद्यमान सत्ताधाऱ्यांना तुरुंगात घालण्याचा दिलेला इशारा हा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचक इशारा आहे. यामुळेच शिंदे आता आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्याची संधी सोडणार नाहीत अशीच चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is clear that aditya thackeray will be the target of bjp and shinde group in future print politics news ssb
Show comments