पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या पदरी निराशाच !

शिवसेनेत बंड करून ४० आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडत भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेल्या अडीच वर्षात पुणे शहर आणि जिल्ह्यात आपली ताकद दाखविता आली नाही.

Pune, Eknath Shinde group Pune, Eknath Shinde group, seat in Pune,
पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या पदरी निराशाच ! (image credit – @uddhavthackeray/twitter/file pic/Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे/fb/loksatta graphics)

पुणे : शिवसेनेत बंड करून ४० आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडत भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेल्या अडीच वर्षात पुणे शहर आणि जिल्ह्यात आपली ताकद दाखविता आली नाही. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाला पुणे शहरात विधानसभेची एकही जागा मिळणे अवघड झाले आहे. या तुलनेत शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वाट्याला किमान एक जागा तरी मिळण्याची आशा आहे.

विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि भाजपने घेतला आहे. ज्या मतदारसंघात महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल ती जागा संबंधित पक्षाला सोडण्याची प्राथमिक चर्चा या पक्षांमध्ये झालेली आहे. हा निकष लावल्यास पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तसेच जिल्ह्यातील एकही मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेना (शिंदे) पक्षाचा नाही. त्यामुळे उमेदवारी मिळविताना नाकीनऊ येणार आहे. त्यातून जिल्ह्यातील एखादी जागा शिवसेना (शिंदे) पक्षाला सोडायची झाल्यास सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने शांत बसावे लागणार आहे.

हेही वाचा – कल्याण पट्ट्यात मनसे-भाजपची हातमिळवणी ?

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी पुणे शहरातील कोथरूड, हडपसर, ग्रामीणमधील खेड – आळंदी, पुरंदर हे दोन तर पिंपरी चिंचवड येथील पिंपरी विधानसभा अशा पाच मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी शिवसेनेचे अस्तित्व होते. मात्र मागील दहा वर्षांत हे अस्तित्व कुठेच राहिलेले नाही. पुणे शहरासह जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची वाताहात झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत शिवसेनेत बंड केले. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे घेतले. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना पक्षाचे पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्यात अस्तित्व वाढवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना फारसे बळ दिले नाही. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला या काळात आपले अस्तित्व निर्माण करून मतदारांवर आपली छाप पाडता आली नाही.

हेही वाचा – कोकणात भाजपमधील असंतुष्ट ठाकरे गटाच्या वाटेवर

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ भाजपकडे, दोन मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे तर एक मतदार काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ देखील महायुतीत मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे आहेत. जे मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे आहेत, तेथे शिवसेना (शिंदे) पक्षापेक्षा अधिक ताकदीचा उमेदवार महायुतीच्या इतर पक्षाकडे असल्याने तेथे यांच्या शिवसेनेला दावा करता येत नाही. पुणे शहरातील हडपसर आणि खडकवासला या मतदारसंघावर शिवसेना (शिंदे) पक्षाने दावा केला आहे. हडपसरमधून शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे तर खडकवासला मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रमेश कोंडे इच्छुक आहेत. यापैकी हडपसरमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने विद्यमान आमदार चेतन तुपे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर खडकवासला बाबतीत भाजपने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र ही जागा भाजप सोडेल, याची शक्यता कमीच आहे.

महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या शिवसेना (ठाकरे) यांची स्थिती देखील फारशी चांगली नाही. उद्धव ठाकरे यांना साथ देणारे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर हे दोघे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. याबरोबरच माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार हे देखील कोथरूडमधून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी ( शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे हडपसरमधून निवडणुकीची तयारी करत आहेत. हडपसर मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशी लढत होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचा मित्र पक्ष म्हणून निवडणुकीत उमेदवार द्यावयाचा झाल्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाला कोथरूडमधून संधी मिळू शकते. त्या तुलनेत शिवसेना (शिंदे) पक्षाला एकही जागेवर निवडणूक लढता येईल, याची शक्यता कमीच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is difficult for the eknath shinde group to get a seat in pune uddhav thackeray group is likely to get one seat print politics news ssb

First published on: 24-10-2024 at 14:19 IST
Show comments