अविनाश कवठेकर
दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आले असले, तरी बारामतीचा गड सर करणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. सर्वसमावेश चेहरा आणि तुल्यबळ उमेदवाराचा अभाव आणि मताधिक्याचे समीकरण सोडविणे हाच मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील आजवरची वाटचाल लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने दोन वर्षे आधीपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ बारामतीवर पवार कुटुंबियांची सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत. तसेच भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांचेही भविष्यात दौरे होणार आहेत. त्यामुळे भाजपने बारामतीला दिलेले राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे. असे असले तरी केवळ दौरा करून बारामती लोकसभा मतदारसंघावर कब्जा करणे भाजपला सहज शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सन २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. त्यातही सन २०१४ मधील निवडणूक लक्षवेधी ठरली होती. मोदी लाटेमध्ये म्हणजे २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे भाजप पुरस्कृत उमेदवार होते. जानकर आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत जानकर यांचा पराभव झाला तर त्यांना या निवडणुकीत ४ लाख ४१ हजार मते मिळाली होती. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात जानकर ६९ हजार मतांनी पराभूत झाले होते.
हेही वाचा… निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाची घाई, आयोगासमोरील सुनावणी सुरू ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती
सन २०१९ च्या निवडणुकीत दौंडमधील कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली. या निवडणुकीत कुल यांना ५ लाख ३० हजार मते प्राप्त झाली. सन २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणारी मते वाढली असली, तरी सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५३ हजार मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यामुळे भाजपची मते वाढली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयातील अंतरही वाढल्याचे स्पष्ट झाले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला (शहराचा काही भाग), पुरंदर, भोर, दौंड आणि इंदापूर या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघात ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य भाजपला मिळाले होते, ही वस्तुस्थिती आहे. याच दोन्ही निवडणुकीत दौंडमधून २०१४ मध्ये २८ हजारांचे तर २०१९ मध्ये ८ हजारांचे मताधिक्य भाजपला मिळाले होते. पुरंदरमधून २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवाराला पाच हजारांचे मिळाले होते, मात्र तेच मताधिक्य २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले होते. भोर आणि इंदापूर तालुक्यात दोन्ही निवडणुकांमध्ये २० हजारांच्या आसपासचे मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळाले होते. बारामती तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मतदान झाल्याने दोन्ही वेळा त्या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करताना मतांचे समीकरणही भाजपला सोडवावे लागणार आहे.
हेही वाचा… गिरीश बापटांना झालंय तरी काय?
बदलती राजकीय परिस्थिती आणि पुरंदर, दौंड, इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीविरोधी परिस्थिती तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या शहरी भागातून भाजप उमेदवाराला होणारे मतदान या बाबींचा विचार करून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देता येईल, असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र भाजपचे वरिष्ठ नेते आणि पवार कुटुंबियांशी असलेली जवळीक, बारामतीमधील भाजपचे कमकुवत संघटन, सातत्याने उमेदवार बदलणे, मतदार संघाबाहेरील उमेदवार निवडणुकीला देणे आणि निवडणुकीला काही दिवस बाकी असताना उमेदवाराच्या नावाची घोषणा करणे यामुळे भाजपला बारामतीचा गड सर करणे काही प्रमाणात अडचणीचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकाराचे विणलेले जाळे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेची बाजूही भाजप नेतृत्वाला विसरता येणार नाही. दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले, तरी एकट्या बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारे मताधिक्य तोडणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे भाजपसाठी ‘मिशन बारामती’ आव्हानात्मक असणार आहे.