मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा इशारा देणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना आता स्वत:च्याच वरळी मतदारसंघात आव्हान उभे राहिले आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत वरळीमधून घटलेले मताधिक्य आणि महायुतीसोबतच मनसेनेही वरळीत चाचपणी सुरू केल्याने सावध झालेले आदित्य ठाकरे यांनी वरळीत आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
वरळी आणि शिवडी मतदारसंघाने शिवसेनेला नेहमीच साथ दिली. कामगार वस्ती, मराठी माणसांच्या चाळी, बीडीडीच्या चाळी, दलितांच्या वस्त्या, गेल्या काही वर्षात आलेला उच्चभ्रू वर्ग असा या वरळीचा चेहरामोहरा आहे. याच भागात शिवसेनेचे पारंपरिक मतदार जास्त आहेत. या विश्वासावरच गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघाची निवड केली होती आणि अपेक्षेप्रमाणे ते येथून सहज निवडून आले. त्यापाठोपाठ राज्यात आलेली मविआची सत्ता आणि आदित्य यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू करण्यात आली. वरळीला ह्यए प्लसह्ण करण्याची आदित्य यांची घोषणा त्याचाच एक भाग होता. यातून मतदारसंघावरील पकड मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र मविआची सत्ता गेल्यानंतर या विकासकामांना खीळ बसली. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आदित्य यांनी राज्यभरात दौरे सुरू केल्याने वरळीतील त्यांचे लक्षही कमी झाले. याचाच फायदा भाजप आणि शिंदे गटाने घेतल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा >>>शेतीचे मुद्दे प्रभावी तरीही शेतकरी नेते पराभूत; महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत असं का घडलं?
उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडल्यापासून भाजपने शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला. भाजपने रीतसर या विभागात वेगवेगळे कार्यक्रम आखून मराठी माणसाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. वरळीच्या मध्यवर्ती भागात जांभोरी मैदानात दहीहंडीचे कार्यक्रम, मराठी दांडिया असे कार्यक्रम केले. त्यातच दोन वर्षांपूर्वी शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर वरळीत ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसू लागले. ठाकरे गटाचे वरळीतील दोन माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. सागरी किनारा प्रकल्पाबाबत वरळीतील कोळी समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या आदित्य ठाकरे यांना सोडवता आल्या नाहीत. त्या मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडवल्यामुळे कोळी समाज ठाकरे यांच्यापासून दुरावल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा… निवृत्त’ हितेंद्र ठाकूर पुन्हा लढणार?
वरळी मतदारसंघ भाग असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आले. मात्र या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी वरळीतून सर्वात कमी म्हणजे सहा हजार इतकेच मताधिक्य मिळाले. हा आदित्य यांच्यासाठी धक्का असून त्यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
आधीच आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाला खिंडार पाडण्याची रणनीती भाजपने आखलेली असताना आता त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे आव्हानही ठाकरे यांना आहे. त्यातच लोकसभेच्या तोंडावर मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे वरळीत मनसेही आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा… Assembly Election 2024: भाजपच्या ठाण्यात केळकरांची कोंडी?
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीत लोकसभेत घातलेले मताधिक्य आणि बदललेली राजकीय समीकरणे ठाकरेंसाठी आव्हानात्मक असतील.