ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आम्ही तुमचे सोशल मीडिया अॅप बंद करू तसेच तुमच्या कार्यालयांवर छापेमारी करू अशी आम्हाला धमकी दिली होती, असे डॉर्सी म्हणाले आहेत. डॉर्सी यांच्या या दाव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून मोदी सरकार उत्तर देणार का? असा सवाल विरोधकांनी केला आहे. तसेच या घटनेतून भारतात हळूहळू लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, हे स्पष्ट होते, अशी टीकाही विरोधकांनी मोदी सरकारवर केली आहे.
देशात लोकशाहीचा गळा घोटला जातोय- संजय राऊत
जॅक डोर्सी यांनी हा खुलासा केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. “देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. लोकशाहीचा गळा कसा घोटला जातोय, ते मी पाहत आहे,” असे संजय राऊत ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.
हेही वाचा >> विरोधकांच्या आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरणार का? जाणून घ्या वेगवेगळ्या पक्षांची सद्यःस्थिती!
काँग्रेसने केली मोदी सरकारवर टीका
काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनीदेखील मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. “जॅक डोर्सी यांनी एका यूट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ज्या ट्विटर अकाऊंट्सवरून शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले जात होते. तसेच सरकारवर टीका केली जात होती ते अकाऊंट ब्लॉक करण्याचा दबाव भारत सरकारने टाकल्याचे डोर्सी यांनी सांगितले आहे. तसेच ट्विटरवर भारतात बंदी आणण्याची तसेच भारतातील कर्मचाऱ्यांच्या घरांवर धाड टाकण्याची धमकी दिली जात होती, असेही डोर्सी म्हणाले आहेत,” असे भाष्य सुरजेवाला यांनी केले आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांची भाजपाच्या मंत्र्यावर सडकून टीका
डोर्सी यांच्या दाव्यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डोर्सी यांच्या कार्यकाळात ट्विटरकडून भारतातील नियमांचे सातत्याने उल्लंघन होत होते, असे चंद्रशेखर म्हणाले. चंद्रशेखर यांच्या या विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्वीटद्वारे टीका केली आहे. “होय ट्विटरने भाजपाचा जहाल आणि द्वेषयुक्त भाषणाचा अजेंडा चालवण्यासाठी नियम मोडले. ट्विटरने जोपर्यंत भाजपाच्या अजेंड्याला पाठिंबा दिला, तोपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र याच माध्यमाचा वापर करून विरोधकांनी भाजपाविरोधात लढण्यास सुरुवात केली, तेव्हाच ट्विटरवर बंदी घालण्याची धमकी देण्यात आली,” असे प्रियांका चतुर्वेदी ट्वीटद्वारे म्हणाल्या.
हेही वाचा >> लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले ब्रिजभूषण सिंह लोकसभा निवडणूक लढवणार का? भर सभेत केले जाहीर; म्हणाले “मी…”
राकेश टिकैत यांनी काय प्रतक्रिया दिली?
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “शेतकरी आंदोलनाला फेसबूक आणि ट्विटर या माध्यमातून जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो मिळत नव्हता; अशी आमच्याकडे माहिती आहे. त्यांनी हा पाठिंबा थांबवण्याचा प्रयत्न केला. डोर्सी यांच्या विधानानंतर हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र अशा कंपन्या कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. भारत सरकारने निश्चितच तसे प्रयत्न केले असतील. डोर्सी यांनी जो दावा केला, तो अगदी योग्य आहे,” अशी प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली.
हेही वाचा >> ‘मनमोहन सिंह यांचे सरकार दुबळे, मोदी सरकारमध्ये दहशतवादाला आळा’, अमित शाहांचा दावा; म्हणाले “लोकसभा निवडणुकीत…”
मोदी सरकारने १२०० खाती बंद करण्याचा दिला होता आदेश
काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनीदेखील मोदी सरकारला लक्ष्य केले. डोर्सी यांनी केलेल्या खुलाशामुळे भारतातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे स्पष्ट होते, असे शिवकुमार म्हणाले. दरम्यान, कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या काळात म्हणजेच २०२१ साली मोदी सरकारने साधारण १२०० ट्विटर खाते बंद करण्याचा आदेश ट्विटर या कंपनीला दिला होता. हे अकाऊंट्स खलिस्तान चळवळीशी संबंधित आहेत, असा दावा तेव्हा मोदी सरकारने केला होता. याआधीही सरकारने साधारण २५० ट्विटर खाती बंद करण्याचा आदेश दिला होता.