JP Nadda National President tenure end : दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाकडून संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे, ज्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. होळीपूर्वी (१४ मार्च) भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतात, असं इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ मध्ये अमित शाह भाजपाचे अध्यक्ष

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने जे. पी. नड्डा यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवली. त्याआधी अमित शाह हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. २०१४ मध्ये त्यांनी आक्रमक प्रचार केला आणि केंद्रात भाजपाला सत्ता मिळवून दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयाचे श्रेय अमित शाह यांना दिलं जातं. त्यांच्या कार्यकाळात भाजपाने उत्तराखंड, महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, हिमाचल प्रदेश, मणिपूर, झारखंड, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्या, तसेच नागालँड आणि मेघालयात आघाडी मिळवली.

मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या प्रमुख हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठं अपयश आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर तब्बल ३०३ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची किमया करून दाखवली, तेव्हा अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जून २०१९ मध्ये भाजपाने पहिल्यांदा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची निवड केली. जानेवारी २०२० मध्ये त्यांची एकमताने भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

आणखी वाचा : 1954 Kumbh Mela Stampede : १९५४ च्या कुंभमेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी, गांधीवादी नेत्यांनी काँग्रेसला धरलं होतं जबाबदार; संसदेत काय घडलं होतं?

जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ कसा राहिला?

दरम्यान, अमित शाह यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर जे. पी. नड्डा यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. नड्डा यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध प्रस्थापित केले. पक्षातील अंतर्गत सूत्राने सांगितले की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना नड्डा यांनी आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. पक्षात त्यांना एक चांगला वक्ता म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या प्रभावशाली भाषणांमुळे इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपाची कास धरली आणि संपूर्ण देशभरात पक्षाला मोठी बळकटी मिळाली.

६४ वर्षीय जे. पी. नड्डा यांनी भाजपाला लोकसभा आणि विधानसभा अशा २६ निवडणुकांमध्ये विजय मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला. २०२३ च्या अखेरीस भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमधील सत्ता कायम ठेवली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी भाजपा आता स्वयंपूर्ण असून पक्षाला पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता नाही असं विधान केलं, ज्यामुळे भाजपा आणि आरएसएसमधील मतभेद उघड झाले आणि त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा ३०३ वरून २४२ पर्यंत घसरल्या. विरोधकांनी संविधान बचावचा नारा दिल्यानंतर मागसवर्गीय समुदायातील मतदारांनी भाजपाकडे पाठ फिरवली.

जे. पी. नड्डा केंद्रीय मंत्रिमंडळात

भाजपाने मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर जे. पी. नड्डा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना मुदतवाढही देण्यात आली. जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने गेल्यावर्षी झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. याचे संपूर्ण श्रेय जे. पी. नड्डा यांनाच दिलं जात आहे, असं पक्षातील अंतर्गत सूत्रांनी सांगितलं.

भाजपाच्या नवीन अध्यक्षांसमोर कोणती आव्हानं?

जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने उत्तर, पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतात आपली पकड मजबूत केली. परंतु, दक्षिण भारतात पक्षाला अद्यापही हवे तसे यश मिळवता आले नाही, त्यामुळे भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांसमोर या प्रदेशात पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्येही पक्षाला मोठं अपयश आलं. आंध्र प्रदेशात भाजपा सध्याच्या सत्ताधारी आघाडीतील लहान भागीदार आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे मान्य केले आहे की, दक्षिण भारतात लोक अजूनही भाजपाकडे उत्तर भारतीयांचा पक्ष म्हणून पाहतात, ज्यामुळे पक्षाला स्थानिक मतदारांवर पकड मिळवण्यात सातत्याने अपयश येत आहे.

हेही वाचा : Parliament Sessions : काम वाढलं पण दिवस घटले; लोकसभेसह देशातील विधानसभांचं कामकाज कसं कमी होत गेलं? काय सांगते आकडेवारी?

भाजपाचे नवीन अध्यक्ष कोण असणार?

२०१६ मध्ये भाजपाने ‘दक्षिण मिशन’साठी एक आराखडा तयार केला होता, परंतु तो प्रभावीपणे राबविला गेला नाही. जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्यांसमोर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपाची स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक संस्कृती, भाषा आणि मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आव्हान असेल. नवीन भाजपा अध्यक्षांची नियुक्ती ही एका नवीन टप्प्याची सुरुवात असेल, ज्यामध्ये दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, तेलंगणातील भाजपा नेते किशन रेड्डी आणि ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यांसारखे नेते भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

भाजपाचे मिशन दक्षिण भारत

भाजपा दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आपली पकड वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रदेशांमध्ये ख्रिश्चन आणि आदिवासी समुदायांची मोठी संख्या आहे. त्यांचा विश्वास आणि समर्थन मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तामिळनाडू, केरळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या राजकारणात ख्रिश्चन आणि आदिवासी समुदाय भाजपाच्या यशाची गुरुकिल्ली असतील. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी नवीन पक्षाध्यक्षांना युवा पिढीचे समर्थन आणि मजबूत नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करावी लागेल. यासाठी पक्षाने युवा नेत्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या विचारांना महत्त्व देणे आणि नेतृत्वाच्या संधी प्रदान करणे आवश्यक आहे.