राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी (२९ डिसेंबर) आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांची राज्यसभेत आपचे अंतरिम पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. आपचे विद्यमान पक्षनेते संजय सिंह हे दिल्ली मद्य घोटाळ्यात सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे सिंह यांच्याऐवजी चढ्ढा यांची अंतरिम पक्षनेते म्हणून नियुक्ती करावी, अशी विनंती आपने केली होती. मात्र, ही विनंती धगखड यांनी फेटाळून लावली आहे.
आपने पत्राद्वारे काय मागणी केली?
आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी राघव चढ्ढा यांची अंतरिम पक्षनेते म्हणून नियुक्ती करावी, अशी विनंती केली होती. त्यासाठी केजरीवाल यांनी धनखड यांच्या नावे पत्र लिहिले होते. १४ डिसेंबर रोजीच्या लिहिलेल्या या पत्रात केजरीवाल यांनी “राज्यसभेत आपच्या अंतरिम पक्षनेतेपदी मी राघव चढ्ढा यांचे नाव सुचवतो आहे. मी आपणास विनंती करतो की, राज्यसभेच्या नियमांनुसार आपण तसा निर्णय घ्यावा,” असे आपल्या पत्रात म्हटले होते.
धनखड यांनी काय उत्तर दिले?
मात्र, राज्यसभेचे सभापती धनखड यांनी केजरीवाल यांची ही विनंती फेटाळली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्राला धनखड यांनी पत्राच्याच रुपात उत्तर दिले आहे. अंतरिम पक्षनेत्याची नियुक्ती करण्याचा तसा कोणताही नियम नाही, असे धनखड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहेत. “पक्षनेतेपदाची निवड ही ‘द लीडर्स अँड चीफ व्हीप्स ऑफ रिकग्नाइज्ड पार्टीज अँड ग्रुप्स इन पार्लामेंट (फॅसिलिटीज) अॅक्ट, १९९८ च्या अधीन येते. तुम्ही केलेली विनंती ही कायद्याच्या अधीन नाही. त्यामुळे ही विनंती मान्य केली जाऊ शकत नाही,” असे धनखड यांनी आपल्या पत्रात म्हटलेले आहे.
कायदा काय सांगतो?
धनखड यांनी आपल्या पत्रात उल्लेख केलेल्या कायद्यात मान्यताप्राप्त पक्ष आणि गट यांच्या पक्षनेता, मुख्य प्रतोद यांची निवड तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत नियम आहेत. याच कायद्याअंतर्गत राज्यसभा, लोकसभेतील पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. प्रत्येक नेता, उपनेता, मुख्य प्रतोद यांना टेलिफोन तसेच सचिवालयीन सुविधा दिल्या जातात.
आपने काय प्रतिक्रिया दिली?
आपच्या सूत्रांनुसार राज्यसभेच्या सचिवालयाने काही बाबतीत पक्षाला स्पष्टीकरण मागितले आहे. पक्ष सचिवालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. तर दुसरीकडे सचिवालयातील सूत्रांनी सांगितले आहे की, आम्ही आपला कोणतेही स्पष्टीकरण मागवलेले नाही. आमची विनंती सभापतींनी फेटाळलेली नाही, असा दावा आपकडून केला जात आहे. सभापतींनी काही सुधारणा करण्यास सांगितलेले आहे. त्या सुधारणा आम्ही करणार आहोत, असे आपचे म्हणणे आहे. दरम्यान, धनखड यांनी आप पक्षाची विनंती फटाळून लावल्यामुळे आता राज्यसभेतील आपचे पक्षनेते हे संजय सिंहच राहतील.