Jaipur Congress Councillors Backing BJP Balmukund Acharya Purify with Gaumutra : नगरसेविका कुसुम यादव यांनी बुधवारी (२६ सप्टेंबर) जयपूर महानगरपालिकेच्या कार्यवाहक महापौर म्हणून शपथ ग्रहण केली. यावेळी सभागृहात हनुमान चालिसा आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हवामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालमुकुंदाचार्य यांनी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नगरसेवकांना गंगाजल आणि गोमूत्र प्राशन करायला लावून त्यांचं कथित शुद्धीकरण केलं. नगरसेवक मनोज मुद्नल, उत्तम शर्मा व ज्योती चौहान या तीन काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. यावेळी बालमुकुंदाचार्य यांनी नगरसेवकांच्या चेहऱ्यावर, अंगावर गंगाजल व गोमूत्र शिंपडलं.
याप्रसंगी कार्यवाहक महापौर कुसुम यादव म्हणाल्या, “सर्वांचं शुद्धीकरण झालं आहे, त्यामुळे आता भ्रष्ट्राचार दूर पळून जाईल. कुसुम यादव महापौरपदाची शपथ घेत असताना सभागृहात भाजपा आमदार गोपाल शर्मा, बालमुकुंद आचार्य यांच्यासह भाजपाचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुनेश गुर्जर यांचा जयपूर महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर भाजपाने जयपूर महापालिकेचे महापौर मुनेश गुर्जर यांना त्यांच्या पदावरून हटवलं होतं. त्यांच्या जागी कुसुम यादव यांची महापौरपदी निवड केली आहे. कुसुम यादव यांना काँग्रेसच्या सात आयाराम नगरसेवकांनी व एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिला आहे. मंगळवारी एकूण आठ नगरसेवक भाजपात सहभागी झाले. दरम्यान, यादव यांनी महापौरपदाची शपथ घेण्यापूर्वी बुधवारी आमदार बालमुकुंद आचार्य यांनी पालिकेच्या इमारतीत नगरसेवक व अधिकाऱ्यांचं कथित शुद्धीकरण केलं.
हे ही वाचा >> मध्य प्रदेशात भाजपा विरुद्ध RSS? सदस्य नोंदणी अभियानाला अभाविपचा तीव्र विरोध; इंदौरमधील घडामोडींमुळे तर्क-वितर्कांना उधाण!
आता महापालिकेत पवित्र वातावरण असेल : आमदार बालमुकुंद आचार्य
बालमुकुंद आचार्य हे जयपूरच्या हवामहल विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आहेत. ते हाथोज धाम मंदिराचे महंत म्हणून ओळखले जातात. बालमुकुंद म्हणाले, “आम्ही या सर्वांना शुद्ध केलं आहे. सर्व अशुद्धी नष्ट झाल्या आहेत. वैदिक मंत्रोच्चारांसह पूजा केल्यानंतर आमच्या बहिणीने (कुसुम यादव) महापौरपदाचा कारभार आपल्या हाती घेतला आहे. आता महापालिकेत पवित्र वातावरण असेल”. यावेळी महापौर कुसुम यादव यांनी हनुमान चालिसाचे पठण केले, तसेच जय श्रीरामचा जयघोष करत पदभार स्वीकारला.
“आम्ही काँग्रेस नगरसेवकांना गंगाजल प्राशन करायला लावलं”
आमदार बालमुकुंद आचार्य म्हणाले, “काँग्रेसच्या भाजपाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांना गंगाजल देण्यात आलं, जे त्यांनी प्राशन केलं आहे. सर्वांनी गंगाजलासह गोमूत्रदेखील प्राशन केलं आहे. वैदिक मंत्रोच्चार त्यांनी ऐकले आहेत. गंगाजल व गोमूत्र प्राशन केल्यानंतर आता ते पूर्णपणे सनातनी झाले आहेत. त्यांच्या कानात वैदिक मंत्रांचा उच्चार करण्यात आला असून आता ते सनातनी झाले आहेत. सनातनी म्हणून आता ते आपलं शहर स्वच्छ व सुंदर बनवतील यात शंका नाही. त्यांच्याबरोबर महापालिकेचे अधिकारीदेखील शुद्ध झाले आहेत. हे अधिकारी आजवर अशुद्ध होते, त्यांना भ्रष्टाचार करण्यास भाग पाडलं जात होतं. मात्र, आता गंगाजल, गोमूत्र व वैदिक मंत्रोच्चारानंतर ते भ्रष्टाचारमुक्त झाले आहेत.”
प्रसारमाध्यमांनी बालमुकुंद यांना विचारलं की, तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गंगाजल व गोमूत्र का दिलंत? त्यावर ते म्हणाले, “आम्ही सर्वांनाच गंगाजल व गोमूत्र प्राशन करायला लावलं. तुम्ही एखादा अपराध केला असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी गंगाजल व गोमूत्र प्राशन केलं जातं, यामुळे त्या व्यक्ती शुद्ध व पवित्र होतात, तुम्ही पूर्णपणे सनातनी होता.”
हे ही वाचा >> BJP in J&K Assembly Elections: अयोध्येनंतर आता भाजपाला वैष्णो देवी मतदारसंघाची धास्ती; थेट मंदिर ट्रस्टच्याच उमेदवाराशी सामना!
आता सर्वजण शुद्ध झाले : आमदार बालमुकुंद आचार्य
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बालमुकुंद आचार्य म्हणाले, मी जेएमसी कार्यालयात गंगाजल व गोमूत्र शिंपडलं. कारण तिथे भ्रष्टाचार होत होता. परंतु, आजपासून महापालिका भ्रष्टाचारमुक्त झाली आहे. माझ्याकडे एक बाटली आहे ज्या गंगाजल व गोमूत्राचं मिश्रण आहे. मी ही बाटली माझ्या कारमध्येच ठेवतो. मी रोज ते गंगाजल प्राशन करतो. तेंच गंगाजल-गोमूत्र मी नगरसेवकांवर शिंपडलं व त्यांना प्यायला दिलं. आता ते शुद्ध व पवित्र झाले आहेत.