पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी घोषित केले की, त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकट्याने लढवेल. ‘एकला चलो रे’, अशी भूमिका घेत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे.

बंगालमध्ये जागावाटप आव्हान असेल याची पूर्वकल्पना काँग्रेसला होतीच. राष्ट्रीय आघाडीचा मुद्दा निवडणुकीनंतर ठरवता येईल. काँग्रेसने ३०० जागा लढवाव्यात आणि उरलेल्या प्रादेशिक पक्षांना एकत्र लढू द्या, असे ममता यांनी सांगितले. जर यावर काँग्रेस सहमत नसेल, तर प्रादेशिक पक्ष स्वबळावर लढू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुरुवारपासून बंगालमध्ये सुरू होणाऱ्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’साठी काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा त्यांना निमंत्रणही दिले नाही, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. हा दावाही पक्षाला आश्चर्याचा धक्का देणाराच होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, “ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य मी वाचले. त्या म्हणाल्या, “आम्हाला भाजपाला हरवायचे आहे. त्यासाठी एकही पाऊल मागे घेणार नाही. त्याच भावनेतून आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करीत आहोत. खूप लांबचा प्रवास असेल, तर कधी कधी रस्त्यात स्पीडब्रेकर येतात. लाल दिवा येतो. पण, याचा अर्थ प्रवास थांबवायचा नसतो. अडथळे पार करून पुढे जायचे असते.”

एक दिवसापूर्वी आसाममध्ये राहुल गांधी त्यांच्या यात्रेच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, त्यांचे ममतांसोबत सौहार्दपूर्ण संबंध आहेत. टीएमसीसोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे आणि कोणतेही मतभेद हे किरकोळ असतात. त्यांचे निराकरण होऊ शकते.

राहुल गांधी यांच्या विधानाचा संदर्भ देत जयराम रमेश म्हणाले, “टीएमसी, विशेषत: ममताजी, या एक मोठ्या नेत्या आहेत. इंडिया आघाडीचा त्या एक अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहेत. ममताजींशिवाय आम्ही इंडिया आघाडीची कल्पना करू शकत नाही. चर्चा सुरू आहे. आम्हाला आशा आहे की, काही मार्ग निघेल आणि इंडिया आघाडी पश्चिम बंगालमधील निवडणूक युती म्हणून लढवेल आणि सर्व पक्षांमध्ये सहकार्य असेल.”

जयराम रमेश यांच्या विधानाबद्दल विचारले असता, टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “शब्द, शब्द आणि आणखी शब्द.” ते पुढे म्हणाले, “टीएमसी देत असलेल्या दोनपेक्षा जास्त जागांसाठी काँग्रेसची मागणी अगदी अवास्तव आणि टॉफी मागण्यासारखी आहे. दोन आठवड्यांत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.“

हेही वाचा : प्रभू श्रीरामांना सजविण्यात आलेल्या प्रत्येक रत्नजडित दागिन्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या सविस्तर..

राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होण्याचे निमंत्रण नसल्याच्या ममतांच्या वक्तव्यावर रमेश म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष बोलले होते, राहुल गांधी बोलले होते, एआयसीसीचे प्रभारी बोलले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर सभांमध्ये सांगितले की, सर्व इंडिया आघाडीतील पक्षांना आमंत्रित केले जात आहे आणि ते सर्व इंडिया आघाडीतील पक्षांशी बोलले आहेत. ममता यांनी कोणत्या संदर्भात असे म्हटले आहे ते मला माहीत नाही. पण मी पाहिले की त्यांनी असेही म्हटले आहे की, भाजपाला पराभूत करणे ही त्यांची प्राथमिकता आहे.”

Story img Loader