भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान ४० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितलं आहे. माझ्या वडिलांवर इंदिरा सरकार असताना कसा अन्याय झाला होता हे जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे. जयशंकर म्हणाले की माझे वडील के. सुब्रमण्यम हे कॅबिनेट सेक्रेटरी होते. मात्र १९८० मध्ये जेव्हा इंदिरा गांधी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना या पदावरून हटवलं.
काय म्हटलं आहे जयशंकर यांनी?
ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एस जयशंकर म्हणाले की माझ्या वडिलांना इंदिरा गांधी यांनी कॅबिनेट सचिव या पदावरून हटवलं. त्यानंतर एका कनिष्ट अधिकाऱ्याला ते पद दिलं. याशिवाय जयशंकर यांनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीवरही भाष्य केलं. ते म्हणाले की विदेश सेवा ते राजकारण हा माझा प्रवास खूप चांगला आहे. मात्र मी पहिल्यापासूनच एक चांगला फॉरेन सर्विस अधिकारी व्हायचं हे स्वप्न पाहिलं होतं.
माझे वडील प्रचंड स्वाभिमानी होते
माझे वडीलही अधिकारी होते. ते जेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी झाले तेव्हा त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. जनता सरकार जेव्हा १९७९ ला आलं होतं त्या सरकारमधले ते सर्वात तरूण कॅबिनेट सेक्रेटरी माझे वडील होते. मात्र १९८० मध्ये इंदिरा गांधी निवडून आल्या पुन्हा पंतप्रधान झाल्या त्यावेळी त्यांनी माझ्या वडिलांना या पदावरून हटवलं. माझे वडील हे त्यांच्या तत्त्वांवर चालणारे होते. त्यांना जेव्हा या पदावरून हटवण्यात आलं त्यानंतर ते कधीही सेक्रेटरी झाले नाहीत. माझ्या वडिलांना जे कनिष्ट अधिकारी होते त्यांना कॅबिनेट सेक्रेटरी हे पद देण्यात आलं. ही बाब माझ्या वडिलांना खटकली, त्यांच्या मनात ही सल कायमच राहिली. मात्र त्यांनी ही बाब कधी आमच्याकडे बोलून दाखवली नाही असंही जयशंकर यांनी या मुलाखतीत सांगितलं.
जयशंकर यांची काँग्रेसवर टीका
जयशंकर यांना या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही आणि मोदी चीनचं नाव घ्यायला घाबरता. त्यावर C H I N A मी चीनचं नाव घेतो आहे जे कुणी मला ऐकत असेल ऐका असं म्हणत राहुल गांधींना जयशंकर यांनी टोला लगावला आहे. आम्ही जर घाबरतो तर एलएसीवर भारतीय लष्कर कुणी पाठवलं? राहुल गांधी यांनी नाही कुणाला पाठवलं, नरेंद्र मोदींनी पाठवलं आहे हे कुणी विसरू नका. चीनच्या सीमेवर आज लष्कर सर्वात मोठ्या संख्येनं उभं आहे. मी चीनचं नाव घेतोय असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.