जळगाव- पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जिल्ह्यातील ११ पैकी सहा मतदारसंघांत नाराज इच्छुकांनी स्वपक्षाविरोधातच बंड पुकारले आहे. बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान मविआ आणि महायुतीपुढे असून त्यांच्या मनधरणीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, काही बंडखोरांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे जाहीर केल्याने त्यांच्यावर वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणला जात असून आमिषेही दाखवली जात आहेत.

विधानसभेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे आणि माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार माजी महापौर जयश्री महाजन यांच्या विरोधात जळगाव शहरातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा >>>उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वाधिक फटका

पाचोरा मतदारसंघात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. मागील निवडणुकीतही शिंदे यांनी आमदार पाटील यांना अपक्ष उमेदवारी करून आव्हान दिले होते. मात्र, त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. याच मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी आमदार दिलीप वाघ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा >>>दिवाळी पहाटला राजकीय प्रचाराचे ‘फटाके’

एरंडोलमध्ये अजित पवार गटाचे डॉ. संभाजीराजे पाटील यांनी तसेच भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल करून महायुतीसमोर पेच निर्माण केला आहे. अमळनेरमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. रावेरमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या विरोधात उमेदवारी केली आहे.

जिल्ह्यात महायुती आणि मविआ दोन्हीकडील बंडखोर वजनदार असल्याने ते सहजपणे माघार घेण्याची शक्यता कमी असल्याने त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे बंडखोरांचे कुटूंबियही त्रस्त झाले आहे.

जळगाव शहर मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाकडून अर्ज मागे घेण्यासाठी निरोप येत आहेत. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.– डॉ.अश्विन सोनवणे ( माजी उपमहापौर, भाजप)