जळगाव – जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ११ मतदारसंघात महायुतीचा विजय झाल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज अद्याप धक्क्यातून सावरलेले नाहीत. दारूण पराभवानंतर अनेक जण अक्षरशः राजकीय विजनवासात गेले असून, अनेकांनी राजकीय कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. पक्षाच्या बैठकांना, कार्यक्रमांना उपस्थित राहणे कमी केले आहे.
विधानसभा निवडणुकीआधी उल्हासित असणारी मविआ निकालानंतर जिल्ह्यात गलितगात्र झाली आहे. महायुती सत्तेत आली असतानाही हे असे कसे झाले, हाच प्रश्न पराभूत उमेदवार विचारताना दिसत आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पराभूत झाल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देवकर यांच्या पक्ष प्रवेशास विरोध केल्याने वरिष्ठ पातळीवरही हा विषय बारगळल्यात जमा आहे. त्यामुळे केवळ नाईलाज म्हणून देवकर सध्या शरद पवार गटात असून ना धड सत्ताधारी ना विरोधक, अशी त्यांची स्थिती आहे. एरंडोल-पारोळा मतदारसंघात पराभूत झाल्यापासून शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील प्रसिद्धीपासून दूर राहत आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात पराभूत झालेल्या शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पराभवासाठी ईव्हीएमवर खापर फोडले होते. न्यायालयात जाण्याचीही तयारी केली होती. परंतु, त्यानंतर त्याही शांतच आहेत. वेगवेगळ्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांचाही आवाज क्षीण झाला आहे. जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात एक लाखापेक्षा जास्त मते मिळविणारे दिलीप खोडपे यांच्या गोटातही निरुत्साह आहे.
हेही वाचा – चावडी : मंत्रीमहोदय, रोज एकानेच दौऱ्यावर यावे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेतील पराभूत उमेदवारांची शांतता स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. नेत्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढील वाटचाल कशी करावी, निवडणुकांची तयारी कशी करणार, कोणते मुद्दे मांडावेत, हे त्यांना समजेनासे झाले आहे. वास्तविक, जिल्ह्यातील कापूस, केळी उत्पादकांचे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम असताना त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, अशी जळगाव जिल्ह्यातील स्थिती आहे. राजकीय विजनवासातून मविआतील नेत्यांनी लवकर बाहेर पडावे, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा – Kurmi Mahakumbh : अयोध्येतील कुर्मी महाकुंभाचं आयोजन हे पोटनिवडणुकीभोवती कसं फिरतं आहे?
विधानसभेच्या निवडणुकीतील अपयशानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण दिसून आल्यावर आम्ही पक्षाची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करून त्यात पराभवावर चिंतन केले. याशिवाय पक्षाला पुन्हा चांगले दिवस आणण्याकरीता सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. – प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी-शरद पवार, जळगाव)
© The Indian Express (P) Ltd