जळगाव : देवेंद्र फडणवीस यांनीच छळ केल्याचा तसेच आपली राजकीय कारकीर्द संपवल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सौम्य भूमिका घेतली आहे. फडणवीस यांच्याशी आपले केवळ तात्विक मतभेद होते आणि आहेत. व्यक्तिगत वैर कधीच नव्हते. भूतकाळात जे काही घडले ते राजकीय परिस्थितीमुळे. आजच्या परिस्थितीत राजकारणातील वैरभाव कायम ठेवून चालत नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊनही भाजपमधील पक्ष प्रवेश रखडल्याने खडसे विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीत (शरद पवार) पुन्हा सक्रिय झाले. परंतु, कन्या रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरात दुसऱ्यांदा पराभव झाल्यापासून त्यांची भाजपविषयीची भाषा अलिकडे सौम्य झाल्याचा प्रत्यय आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी टोकाची भूमिका घेतल्याचे आरोप फेटाळून लावत खडसे यांनी त्यांच्या आणि फडणवीस यांच्यातील संबंधांविषयी जळगावमध्ये माध्यमांकडे भूमिका मांडली. फडणवीस यांच्याशी वैयक्तिक कधीच वैर नव्हते. फक्त तात्विक मतभेद होते, ते आजही कायम आहेत. आमच्यात तणाव राहिलेला नाही. आम्ही भारत-पाकिस्तानसारखे शत्रू नाही. आम्ही एकमेकांशी बोलतो, चर्चा करतो. विरोधी पक्षाची भूमिका असेल तेव्हा ती प्रामाणिकपणे मांडतो. यात व्यक्तिगत शत्रुत्वाचा प्रश्न कधीच नव्हता. भूतकाळात घडलेल्या गोष्टी राजकीय होत्या, व्यक्तिगत नव्हत्या. त्यामुळे सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये फडणवीस आणि आपल्यात संवाद राहील, असे खडसे यांनी नमूद केले. राजकीय जीवनात मतभेद स्वाभाविक असल्याचे सांगत फडणवीस आणि त्यांच्यातील दिलजमाईचे संकेत फेटाळले.
हेही वाचा : शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आले, हे मान्य करावे लागेल. लोकांनी त्यांना निवडून दिले. जनमत त्यांच्याबरोबर आहे. आमचा निवडणुकीत पराभव झाला. यामागील कारणे आम्ही तपासून पाहू. पण पराभवामुळे राजकीय जबाबदारी संपत नाही. विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडणे ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती निभावणार आहे, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.