जळगाव : जिल्ह्यातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार यांची साथ सोडून आता राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. देवकर हे अजित पवार यांची सोमवारी मुंबईत भेट घेणार असून, त्यानंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित होणार आहे. स्वतः देवकर यांनी यास दुजोरा दिला आहे.
विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आलेले गुलाबराव देवकर यांना तत्कालिन आघाडीच्या सरकारमध्ये कृषी व परिवहन राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. याशिवाय जळगावच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये यशाने देवकर यांना सतत हुलकावणी दिली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार गुलाबराव पाटील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मतदारसंघात सकारात्मक वातावरण असल्यानंतरही त्यांना अपयश मिळाल्याने राष्ट्रवादीत (शरद पवार) आश्चर्य व्यक्त करण्यात आले. महाविकास आघाडीत असलेला सुसूत्रतेचा अभाव, शरद पवार गटाचे कमकुवत पक्ष संघटन देखील त्यास तितकेच कारणीभूत ठरले. विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर विरोधकांकडील अनेक जण आता सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये जाण्याची तयारी करु लागले आहेत. देवकर हे त्यापैकीच एक.
हेही वाचा: आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार
राष्ट्रवादी काँग्रेस विभाजित झाल्यानंतर त्याचवेळी गुलाबराव देवकर यांना अजित पवार गटाने त्यांच्याबरोबर येण्याची गळ घातली होती. मात्र, देवकर यांनी तेव्हा शरद पवार यांच्यावरील निष्ठेतून आहे तिथेच राहण्याचा निर्णय घेत अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देवकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आता अजित पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांचा नेहमीसारखा विलंब…अजित पवार यांची कोपरखळी
विधानसभा निवडणुकीनंतर जळगावमध्ये आयोजित चिंतन बैठकीत समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश करण्याचा आग्रह केला होता. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही आमच्याशी संपर्क साधून तुमचे पक्षात स्वागत असल्याचा निरोप दिला होता. त्यानुसार पक्षाध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेण्याचे नियोजन आहे.
गुलाबराव देवकर, माजी मंत्री, राष्ट्रवादी (शरद पवार)