जम्मू-काश्मीरला ‘विशेष राज्या’चा दर्जा देणारे कलम ३७० आज म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आले होते. या निर्णयानंतर जम्मू-काश्मीर या राज्याची जम्मू-काश्मीर व लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज जम्मू-काश्मीरचा नागरिक स्वतंत्र असून, तो कोणालाही बांधील नाही. दहशतवादी संघटनांचा प्रभाव कमी झाला आहे, असा दावा केला. तर, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी आमच्या नेत्यांना कार्यक्रम घेण्यास मनाई केली जात आहे, असा आरोप केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्लेषण : ‘कलम ३७०’ची कूळकथा; हे कलम का आणि कोणासाठी ?

कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई : पीडीपीचा आरोप

कमल ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये भाजपातर्फे आज उत्सव साजरा केला जाणार आहे; तर दुसरीकडे पीडीपी पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात येत आहे, असा आरोप केला. तसेच “प्रशासनाने आम्हाला कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही आमच्या श्रीनगर येथील पक्षाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या शेर-ए-काश्मीर पार्क या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला समविचारी पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आम्हाला श्रीनगर प्रशासनाने असा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली आहे,” असा आरोप पीडीपी पक्षाने केला. “जम्मू-काश्मीरचे पोलिस ५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पीडीपी पक्षाच्या नेत्यांना ताब्यात का घेत आहेत? आमच्या पक्षाचे नेते आरिफ लैगरो यांना पोलिस घेऊन गेले आहेत. व्हिडीओमध्ये तसे दिसत आहे,” असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईचा एक व्हिडीओदेखील त्यांनी ट्वीट केला आहे.

दहशतवाद्यांचा प्रभाव संपुष्टात आला : मनोज सिन्हा

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भय कमी झाले आहे. सध्या सर्व काही सुरळीत आहे, असा दावा केला. “सध्या रस्त्यावरचा हिंसाचार कमी झाला आहे. अगोदर दहशतवादी या परिसरात सर्व काही बंद ठेवण्याची हाक द्यायचे; मात्र आता हे प्रमाण कमी झाले आहे. त्यांचा प्रभाव सध्या संपुष्टात आला आहे. शाळा, महाविद्यालये वर्षभर सुरू असतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काश्मीरमधील सर्वसामान्य माणूस आता कोणाशीही बांधील नाही. अगोदर सूर्यास्त झाला की, लोक घरी परतण्यासाठी घाई करायचे. आता मात्र श्रीनगरसारखे शहर रात्रभर सुरू असते,” असे मनोज सिन्हा म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir article 370 abrogation mehbooba mufti allegations lieutenant governor manoj sinha claims know detail information prd