जम्मू : काश्मीर खोऱ्यात भाजपविरोधावर विधानसभेची निवडणूक लढवली जात असली तरी, जम्मू विभागातही लोक भाजपवर नाराज असल्याचे पाहायला मिळते. त्याचवेळी, काँग्रेसला मत देणे म्हणजे ‘नॅशनल कॉन्फरन्स’ला ताकद देण्याजोगे असल्याने सशक्त पर्यायाअभावी मते भाजपलाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू विभागात ४३ जागा असून अधिकाधिक जागा जिंकल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही, हे लक्षात घेऊन केंद्रीय नेतृत्वाने चाणाक्षपणे उमेदवारांची निवड केली आहे. स्वत:च्या ताकदीवर जिंकू शकतील अशा देवेंद्रसिंह राणा यांच्यासारख्या इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री निर्मलसिंह किंवा ज्येष्ठ नेते सुखनंदन चौधरी, श्याम चौधरी, सत शर्मा अशा दिग्गजांना वगळण्यात आले आहे. ज्येष्ठ नेत्यांची नाराजी डावलून केंद्रीय नेतृत्वाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
‘आम्ही भाजपवर नाराज नाही, त्यांच्या नेत्यांवर आमचा राग आहे. त्यांनी आमच्यासाठी काम काय केले सांगा? आमचा आमदार मतदारसंघात फिरत नाही, आमची कामे करत नसेल तर त्याला पुन्हा मत कशाला द्यायचे’, असा प्रतिप्रश्न दुकानदार अमित शर्मा यांनी केला… जम्मूपासून काही अंतरावरील पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या टाली मंदिराचे पुजारी सुरेंद्र शर्मा भाजपवर नाराज आहेत. शर्मांसारखे ६० हजारांहून अधिक लोक रोजंदारीवर काम करतात. त्यांची वेतनवाढीची कित्येक वर्षांची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. ‘आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, यावेळी भाजपला मत देणार नाही’, असे शर्मांनी सांगितले.
हेही वाचा >>> कारण राजकारण : आदिती तटकरेंसमोर धार्मिक ध्रुवीकरण थोपविण्याचे आव्हान
जम्मूमध्ये अनुच्छेद ३७० पेक्षाही विकासाचे आणि दैनंदिन जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. हे प्रश्न भाजपच्या आमदारांनी-नेत्यांनी सोडवले नसल्यामुळे भाजपबद्दल लोकांमध्ये संताप आहे. तरीही नॅशनल कॉन्फरन्सशी आघाडी केल्यामुळे काँग्रेसला मते मिळणार नाहीत असे काहींचे म्हणणे आहे.
भाजपने काही दिग्गजांना डावलल्याचा पक्षाला फटका बसू शकतो असे सांगितले जाते. सुखनंदन चौधरी यांचे जाट समाजामध्ये मोठे प्रस्थ असून काही मतदारसंघांमध्ये जाट निर्णायक ठरतात. ‘आम्ही पक्षाविरोधात काही करणार नाही, आम्ही शांत राहू’ अशी प्रतिक्रिया चौधरी यांचे पुत्र विकास यांनी दिली. जम्मू विभागातील भाजपचे काही नाराज नेते अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत, काहींनी ‘शांत’ राहण्याचा निर्णय घेतला आहे!
नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
या नाराजीची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने निर्मलसिंह यांना प्रचार समितीचे अध्यक्ष तर सुखनंदन चौधरी यांना उपाध्यक्षपद दिले. सत शर्मा यांना कार्यकारी अध्यक्ष केले. माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता यांना निवडणूक व्यवस्थापन समितीची जबाबदारी दिली. भाजपने जम्मूमध्ये ही अडथळ्यांची शर्यत पार करून २५-३० जागा जिंकण्यात यश मिळवले तर सरकार स्थापनेत भाजपची भूमिका मोठी असेल असे मानले जात आहे.
लोक कितीही नाराज असले तरी मत भाजपलाच देतील. काँग्रेस कमकुवत आहे. शिवाय, नॅशनल कॉन्फरन्सशी आघाडी केल्यामुळे काँग्रेसला मत दिले तर मुस्लिमांना मत दिल्यासारखे असेल. – सुशील शर्मा, सामाजिक कार्यकर्ते
(क्रमश:)