Jammu Kashmir Election assembly Polls 2024 : भारतीय जनता पार्टीसाठी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची वाट दिवसेंदिवस खडतर होत चालली आहे. राज्यात १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडेल. ४ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. भाजपासह राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक पक्षांचा तिकीटवाटपाचा कार्यक्रम चालू आहे. अशातच तिकीटवाटपावरून झालेल्या वादातून भाजपाच्या जम्मू-काश्मीरमधील दोन जुन्या व वरिष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. काश्मीरमधील भाजपाच्या नेत्यांमध्ये सारं काही आलबेल नाही. पक्षाने काश्मीरमधील अर्ध्याहून अधिक जागा न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काश्मीर खोऱ्यातील १६ पैकी आठ जागांवर भाजपा उमेदवार उभे करणार नसल्याचं पक्षाने जाहीर केलं आहे. १८ सप्टेंबर रोजी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या जागांवर मतदान होणार आहे.
भाजपा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सर्व जागा लढवणार आहे. या टप्प्यांमध्ये काश्मीर खोऱ्यातील केवळ एका जागेवर मतदान होणार आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे काश्मीर खोऱ्यातील पक्षाचं अस्तित्व नष्ट होईल अशी भिती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने काश्मीरमधील तीन पैकी एकाही जागेवर उमेदवार उभा केला नव्हता. अनेक नेत्यांनी म्हटलं आहे की त्यांना पक्षाने निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले होते, मात्र अखेर त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. अनेकजण पक्षातील वरिष्ठांच्या या वागण्याचं ‘वापरा आणि फेकून धोरण’ असं वर्णन करत आहेत.
निष्ठावानांऐवजी आयारामांना संधी दिल्यामुळे नाराजी
भाजपा काश्मीर खोऱ्यातील ज्या जागांवर उमेदवार उभे करणार नाही त्या सगळ्या जागा दक्षिण काश्मीरमध्ये आहेत. हा भाग पूर्वी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला मानला जायचा. दरम्यान, एका स्थानिक भाजपा नेत्याने इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. ते म्हणाले, पक्षाने आतापर्यंत ज्या लोकांना काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे ते सर्व नेते अलीकडेच पक्षात दाखल झाले आहेत. मागील दोन दशकांपासून भाजपात असलेल्या लोकांऐवजी पक्षाने नव्या नेत्यांवर अधिक विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
हे ही वाचा >> RSS व भाजपात समन्वयाच्या अडचणी, संघानं केलं मान्य; प्रसिद्धीप्रमुख म्हणाले, “हे फक्त व्यवस्थापनात्मक…”
राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फयाज अहमद भट्ट,, मंजूर कुलगामी आणि बिलाल अहमद यांच्यासह अल्ताफ ठाकूर, मंजूर अहद भट यांचा समावेश आहे. पक्षाची राज्यात फार ओळख नव्हती तेव्हापासून ही मंडळी पक्षात आहेत. मात्र त्यांच्या कामाचं पक्षाने आज जे फळ दिलंय ते पाहून अनेकांचा हिरमोड झाला आहे.
गेल्या आठवड्यात भाजपा उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुलवामा येथील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य मिन्हा लतीफ यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पंपोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी लतीफ प्रयत्न करत होते. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपाला अलविदा म्हटलं. शौकत गायूर यांना या मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. शौकत काही महिन्यांपूर्वीच भाजपात आले आहेत.
हे ही वाचा >> K C Tyagi : जदयूच्या के. सी. त्यागींना स्पष्टवक्तेपणा भोवला? प्रवक्तेपदाची सोडचिठ्ठी एनडीएमुळे?
अंतर्गत राजकारणाचा फटका
पक्षातील सूत्रांनी सांगितलं की भाजपाची जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वेगवेगळी शक्ती केंद्रं असल्यामुळे पक्षांतर्गत समस्या वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात भाजपाच्या काश्मीर खोऱ्यातील सर्व नेत्यांनी एकत्र राजीनामा देण्याची धमकी दिली होती. त्यांनी आरोप केला होता की पक्षाच्या जम्मूमधील नेत्यांचा काश्मिरी नेत्यांवर विश्वास नाही. ते काश्मीरमधील नेत्यांना फारसं महत्त्व देत नाहीत. त्यावर पक्षाने स्थानिक नेतृत्वात काही बदल केले, मात्र त्यामुळे मूळ समस्येचं निराकारण झालं नाही. दरम्यान, एका भाजपा नेत्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की प्रत्येक नेता त्याच्या-त्याच्या केडरला महत्त्व देतोय, प्रचार करतोय. रवींद्र रैना (भाजपा प्रदेशाध्यक्ष), सुनील शर्मा (माजी मंत्री) व अशोक कौल (भाजपाचे सरचिटणीस) या तीन नेत्यांचं पक्षात वर्चस्व आहे. मात्र तिघांनी आपापले गट बनवले आहेत. त्यांच्यातील अंतर्गत राजकारणाचा पक्षाला फटका बसतोय.