हरियाणामध्ये २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ‘किंगमेकर’च्या भूमिकेतून पुढे आलेल्या जननायक जनता पक्षाचे (JJP) प्रमुख आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आता शेजारच्या राजस्थान राज्यात पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवावी, या उद्देशाने त्यांनी राजस्थानात प्रवेश केला आहे. चौटाला यांनी बुधवार (६ सप्टेंबर) ते शनिवार (९ सप्टेंबर) असा चार दिवसांचा राजस्थान दौरा केला. यावेळी काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन केले. नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये राजस्थानमधील २०० विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. सध्या, विधानसभेत काँग्रेसप्रणीत अशोक गहलोत सरकारकडे १०७ आमदार तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडे ९३ आमदार आहेत.
हरियाणाची विधानसभा निवडणूक लढविताना जेजेपीने जी आश्वासने दिली होती, तीच आश्वासने राजस्थानमध्येही देण्यात येत आहेत. नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण कमी करणे, पिक नुकसानीची त्वरीत भरपाई देणे, पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देणे, शेतमाल खरेदी प्रक्रिया सुलभ करणे, शेतकऱ्यांना त्यांचा घामाचा दाम देणे आणि कृषी बाजार व्यवस्थेला बळकटी देणे अशाप्रकारची आश्वासने जेजेपी पक्षाकडून दिली जात आहेत. चौटाला यांचा प्रचाराचा भर ग्रामीण भागावर अधिक आहे. त्यातही तरुणांना भावतील अशा योजनांची आश्वासने दिली जात आहेत.
दुष्यंत चौटाला यांचे पणजोबा चौधरी देवी लाल हे भारताचे सहावे उपपंतप्रधान होते. १९८९ साली राजस्थानमधील सिकर लोकसभा मतदारसंघ आणि हरियाणा राज्यातील रोहतक लोकसभा मतदारसंघातून एकाच वेळी निवडून येण्याची किमया त्यांनी साधली होती. १९०० च्या दशकात हरियाणा मधील सिरसा जिल्ह्यात स्थायिक होण्यापूर्वी देवी लाल यांच्या कुटुंबियांचे मूळ राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात होते.
जेजेपी हरियाणात भाजपासह सत्तेत सहभागी आहे. राजस्थानमध्ये भाजपाशी युती करून निवडणुका लढवायच्या की स्वबळावर निवडणुकांना सामोरे जायचे, हे अद्याप जेजेपीने ठरविलेले नाही. मात्र काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढणे हे भाजपा आणि जेजेपी या दोन्ही पक्षांचे समान लक्ष्य आहे. बिकानेर येथे बोलत असताना दुष्यंत चौटाला म्हणाले की, देवी लाल यांची जयंती राजस्थानमध्ये साजरी केली जाईल. दुष्यंत यांचे वडील अजय चौटाला, लहान भाऊ दिग्विजय चौटाला, हरियाणाचे मंत्री अनूप धनक आणि इतर जेजेपीचे नेते एकत्रितपणे राजस्थानच्या विधानसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत.
“मी झुनझुनू, जयपूर, सिकर, नागौर आणि बिकानेर या जिल्ह्यांचा गेल्या काही दिवसांमध्ये दौरा केला. राजस्थानच्या जनतेने मला जो प्रतिसाद दिला, तो पाहून मी भारावून गेलो. राजस्थानमधील जनता काँग्रेसच्या कारभाराला अतिशय विटली असून त्यांनी राज्याची लूट केली आहे. अमली पदार्थाचे सेवन, कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी, खाण माफिया आणि पेपर फोडणारा माफिया यांना कंटाळलेल्या जनतेला आता नवा बदल हवा आहे. त्यामुळेच येथील जनता जेजेपीशी जोडली जात आहे. आमच्या पक्षाने ‘चावीचे निशाण असेल, मुख्यमंत्री शेतकरी असेल’ अशी घोषणाही दिली आहे. त्यामुळेच अनेक लोक आता जेजेपीमध्ये सामील होण्यास इच्छूक आहेत. आम्ही एकत्रितपणे काम करून राजस्थान विधानसभेत प्रवेश करण्याचा नक्कीच प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया दुष्यंत चौटाला यांनी माध्यमांशी बोलताना दिली असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने नमूद केले.
जेजेपी राजस्थानमधील किमान २५ ते ३० जागा लढविण्यास इच्छूक आहे. भाजपाशी युती करून जागावाटपावर काही वाटाघाटी होतेय का याचीही चाचपणी पक्षाकडून केली जात आहे. दुष्यंत चौटाला म्हणाले, “त्यांच्याशी (भाजपा) चर्चा सुरू आहे. पण सध्यातरी आम्ही आमचा पक्ष बळकट करण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे आम्ही २५-३० जागा लढवू. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे राजस्थानमधील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाशी जोडू पाहत आहे आणि आगामी काळात हा युवा वर्ग आमची ताकद बनू शकतो.”
जेजेपीने राजस्थानमध्ये जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या १८ जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आमच्या पक्षाला केवळ चार वर्ष झालेली आहेत. जर आम्ही आताच २५ ते ३० जागांवर कार्यकर्ते तयार केले, तर भविष्यात संपूर्ण राजस्थानमध्ये पसरणे आमच्यासाठी कठीण काम नसेल, असेही दुष्यंत चौटाला म्हणाले.