नवी दिल्ली : ‘आम्हाला मते द्या नाही तर जाटांची सत्ता येईल’, हा भीती दाखवणारा हरियाणातील प्रचार जाटेतर आणि दलितांची मते भाजपला मिळवून गेला. शिवाय, जाटप्रभाव असलेल्या मतदारंसंघांमध्येही भाजपने विजय मिळवला. लोकसभेप्रमाणे दलितांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाली नाहीत. त्यात अपक्षांनी काँग्रेसचा खेळ पूर्णपणे बिघडवून टाकला. या चार प्रमुख कारणांमुळे हरियाणामध्ये भाजपचा सलग तिसऱ्यांदा सत्तेवर बसण्याचा मार्ग मोकळा झाला.
शेतकरी आंदोलन व महिला कुस्तीगिरांवरील अन्याय, अग्निवीर योजना आदी वादग्रस्त मुद्द्यांमुळे सुमारे ३० टक्के जाट मतदार एकगठ्ठा काँग्रेसच्या मागे उभे राहील याची खात्री काँग्रेसला होती. जाट, दलित आणि मुस्लिम एकत्र आले तर काँग्रेसचा विजय निश्चित होता. दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाची १० टक्के प्रामुख्याने जाट मते काँग्रेसला तर ३ टक्के मते भाजपकडे गेली. शिवाय, कुरुक्षेत्र व हिस्सार भागांतील जाटबहुल मतदारसंघही भाजपने जिंकले. मुस्लीम काँग्रेसकडे राहिले. सिरसा वगैरे दलितप्रभावी मतदारसंघात मात्र काँग्रेस विजयी झाला.
भाजपने जिंकलेल्या डझनभर मतदारसंघांमध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांनी काँग्रेसला पराभूत केले. सुमारे ८-१० मतदारसंघांमध्ये १० ते २० हजार मते घेतली, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार ५-६ हजारांच्या फरकाने पराभूत झाला. बहादूरगडमध्ये काँग्रेसचा बंडखोर राजेश जून जिंकले. भाजपने अत्यंत चलाख खेळी करून हरियाणात वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार उभे केले होते. सुमारे साडेचारशे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. काही मतदारसंघांमध्ये आप, बसप, राष्ट्रीय लोकदल या पक्षांच्या उमेदवारांमुळे काँग्रेसची मते जाट व दलित मते विभागली गेली.
हेही वाचा : काश्मीरमधील मतविभागणीचे भाजपचे डावपेच अपयशी
भाजपने ‘अतिसूक्ष्म व्यवस्थापना’तून मोठा पराभव टाळला इतकेच नव्हे तर बहुमताचा आकडाही पार केला. भाजपने लोकांचा सरकारविरोधी राग टाळण्यासाठी ६० नव्या चेहऱ्यांना संधी दिली. याउलट, काँग्रेसने पराभूत झालेल्या १७ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीत उतरवले. भाजपने ‘३६ बिरादरी’तील जाटेतर समूहाचा पाठिंबा कायम ठेवण्यात यश मिळवले. या बिरादरीमध्ये उच्चवर्णीयांप्रमाणे ओबीसींचाही समावेश होतो. उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीत यादव-मुस्लिमांमुळे ओबीसी व दलितांनी भाजपला मते दिली होती. तसेच हरियाणामध्ये ओबीसी-दलितांनी भाजपला मते दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दलित मतांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
भाजप सरकारविरोधात नाराजी असल्याचे मानले जात होते पण, प्रत्यक्षात भाजपच्या मतांमध्ये सुमारे ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये भाजपला ३६ टक्के मते होती, ती ३९ टक्के झाली आहेत. काँग्रेसच्या मतांमध्ये १० टक्क्यांची वाढ होऊन ती ३९ टक्क्यांवर गेली असली तरी अपक्ष आणि दलित मतांची विभागणी या दोन प्रमुख कारणांमुळे काँग्रेसला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही.
हेही वाचा : गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
दुफळी, अतिआत्मविश्वासाचा काँग्रेसला फटका
काँग्रेसने निवडणुकीची सूत्रे भूपेंद्र हुड्डा या जाट नेत्याकडे दिली होती. सुमारे ७० उमेदवार हुड्डांच्या मर्जीतील होते. हुड्डा विरोधात शैलजा, रणजित सुरजेवाला आदी अंतर्गत भांडणांमध्ये काँग्रेस अडकून पडल्याचे पहायला मिळाले. शर्यत जिंकणारच हा अतिआत्मविश्वास विश्वास जसा सशाला भोवला आणि कासव जिंकले तसेच हरियाणामध्ये काँग्रेसला आपणच जिंकणार हा उद्दामपणा अंगाशी आला आणि जाटेतर व अपक्षांच्या मदतीने भाजपने सलग तिसरा विजय मिळवला!