सौरभ कुलश्रेष्ठ
विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे देणे व लोकप्रतिनिधींचे समाधान करण्याची जागा ही विधानसभेचे सभागृह हीच आहे विधानसभेच्या अध्यक्षांचे दालन नव्हे, असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना गुरुवारी सुनावले.
हेही वाचा- जयंत पाटलांना शह देताना भाजपमधील फुटीचे दर्शन
राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते. मात्र योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली. त्यावर या प्रकरणात माझ्या दालनात बैठक घेऊन प्रश्नांवर सविस्तर उत्तरे घेऊ आणि विरोधकांचे समाधान करू, असे म्हणत आधी विकास विकास मंत्री विजयकुमार गावित यांना सावरण्याचा आणि पुढचा प्रश्न घेण्याचा प्रयत्न विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला.
हेही वाचा- चंद्रपूर विमानतळ कामाबाबत विधान भवनात बैठक, गती वाढविण्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा आदेश
त्यास जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे देणे व लोकप्रतिनिधींचे समाधान करण्याची जागा ही विधानसभेचे सभागृह हीच आहे विधानसभेच्या अध्यक्षांचे दालन नव्हे, असे खडे बोल पाटील यांनी नार्वेकर यांना सुनावले. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी मंत्री आणि गटनेते जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि सर्व विरोधी आमदारांनी सभात्याग केला.