नगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर होती. पक्ष जिल्ह्यातील जे संभाव्य मतदारसंघ लढवू इच्छित आहे, त्या मतदारसंघात प्रदेशाध्यक्षांची यात्रा गेली, तेथे त्यांनी सभा घेतल्या. मात्र त्यांचा हा दौरा पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळून झाला. प्रदेशाध्यक्ष ज्याज्या वेळी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, जिल्हा पिंजून काढतात, त्यावेळी त्यांचे सर्व कार्यक्रम हे कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळून होत असतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना यापूर्वीही दोघातील विसंवादाचे दर्शन घडले आणि आताही ते पुन्हा घडलेच. प्रत्येकवेळी दोघातील खटके जिल्ह्याच्या पक्षांतर्गत रणांगणात निदर्शनास येतात.

केवळ प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांचा दौरा कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळून झाला असे नव्हे तर त्यांच्या ज्या पाच ठिकाणी सभा झाल्या, त्या सर्व ठिकाणी पक्षाच्या खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जातीने हजेरी लावली. त्याला अपवाद होते फक्त आमदार रोहित पवार. विशेष म्हणजे रोहित पवार मतदारसंघात उपस्थित असूनही ते प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत, त्यातूनच प्रदेशाध्यक्ष व रोहित पवार यांच्यातील विसंवादाची जाहीर चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

हेही वाचा >>>महाराष्ट्राचा सातबारा अदानींच्या नावे लिहिणार का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

या विसंवादाची झलक काही जिल्ह्यात प्रथमच पहावयास मिळाली असेही नव्हे. यापूर्वीही लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या, मात्र त्या रोहित पवार यांचा मतदारसंघ वगळून आणि पवार यांनीही त्याकडे पाठ फिरवलेली होती. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनाची सभा नगरमध्ये झाली. सर्वच नवनिर्वाचित खासदारांसह शरद पवार त्यास उपस्थित होते. मात्र या सर्वांना प्रदेशाध्यक्ष पाटील व रोहित पवार यांच्यातील वादाचे जाहीर प्रदर्शन घडले. स्वतः शरद पवार यांनी त्यावर कोठलेही भाष्य केले नाही. म्हणजे ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा जिल्हा दौरा होतो, त्यावेळी दोघातील विसंवादाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष असतेच असते.

रोहित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले नेतृत्व प्रस्थापित प्रयत्न आहेत. त्यासाठी ते सातत्याने राज्यात विविध यात्रा काढत दौरे करत असतात. मात्र शरद पवार यांच्या नातवाच्या मतदारसंघात जाणे त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष टाळतात. नगरमधील सभेनंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांना शिवस्वराज्य यात्रा कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळून होत आहे, पक्षाचे इतर आमदार यात्रेत सहभागी होत असताना रोहित पवार यात्रेत सहभागी नाहीत यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, शिवस्वराज्य यात्रेची माहिती त्यांना दिली होती, परंतू त्यांनी आपण मतदारसंघातच अन्य कामात व्यस्त असल्याचे सांगताना, प्रदेशाध्यक्षांनी याविषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

रोहित पवार यांचे पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशीही फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. त्यांच्या कार्यपध्दतीवरुन मतदारसंघात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारीही त्यांच्यापासून दुरावत चालले आहेत. लोकसभेतील विजयानंतरही काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे रोहित पवार यांचा पक्षांतर्गत आणि ‘मविआ’ अंतर्गत असा दुहेरी संघर्ष सुरू असल्याचे दिसते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा दौरा रोहित पवार यांना व त्यांच्या मतदारसंघाला टाळून होत आहे की रोहित पवार प्रदेशाध्यक्षांपासून अंतर ठेवून आहेत, याचे गौडबंगाल जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना अद्याप उलगडलेले नाही. मध्यंतरी रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यपदावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

santosh pradhan sattakaran.ls@gmail.com