संतोष प्रधान
राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वात बदल होणार नाही आणि आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा वा नगरपालिका निवडणुका या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील हे अधोरेखित झाले. विरोधी पक्षनेेते पद न मिळाल्याने नाराज झालेल्या जयंतरावांचे पक्षात महत्त्व अबाधित ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील हेच कायम राहतील, असे स्पष्ट झाले. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड ही मे २०१८ मध्ये झाली होती. २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूक ही त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात लढविण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदास चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल, अशी अटकळ राष्ट्रवादीत बांधण्यात येत होती. पण आगामी निवडणुकांपर्यंत तरी जयंत पाटील हेच अध्यक्ष असतील, असा सूचक संदेश पक्षाने दिला.
महाविकास आघाडीचे सरकार गडगडल्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावे ही जयंत पाटील यांची इच्छा होती. पण अजित पवार यांच्याकडे हे पद सोपविण्याचा पक्षात निर्णय झाला. परिणामी जयंतराव काहीसे नाराज झाले होते. त्यातच जयंतराव पक्षांतर करणार अशी पुडी कोणीतरी सोडली. नव्या सरकारमध्ये जलसंपदा खाते हे अद्यापही कोणाकडे सोपविण्यात आलेले नाही. हे खाते पाटील यांच्यासाठीच फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवल्याची चर्चा सुरू झाली. जयंतरावांच्या पुत्राच्या कार्यक्रमावरील फलकावरून शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांची छायाचित्रे गायब झाल्याने संशय बळावत गेला.महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यावर जयंतरावांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची विनंती पक्ष नेतृत्वाला केली होती. पण पुढील व्यवस्था होईपर्यंत अध्यक्षपद त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले. अजून वर्षभर तरी अध्यक्षपद त्यांच्याकडे कायम राहील, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.
विरोधी पक्षनेतेपद नाही याशिवाय अध्यक्षपदावरून दूर केले असते तर आणखी वेगळी चर्चा सुरू झाली असती. यामुळेच राष्ट्रवादीने जयंत पाटील यांचे महत्त्व कायम राखले. पक्षाचा अधिक विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला होता. सत्तेच्या काळात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी दौरे केले. होते.
काँग्रेस व शिवसेना कमकुवत झालेली असताना राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी संधी असल्याने त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे सारे नियोजन सुरू झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. या दृष्टीने जयंत पाटील यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.