अश्लील फोटो पाठवून एका महिलेचा छळ केल्याचा आरोप झाल्याने राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. गोरे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर असे खोटे दावे करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गोरे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सरपंच हत्याप्रकरणी झालेल्या आरोपांनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता जयकुमार गोरे वादाच्या भोवऱ्यास सापडले आहेत. २०१६मध्ये जयकुमार गोरे आमदार असताना एका महिलेला त्यांनी त्रास दिल्याचे वृत्त ‘सामना’ने प्रसिद्ध केले. व्हॉट्सअॅपवर त्या महिलेला स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा तसंच तिचा छळ केल्याचा आरोप गोरे यांच्यावर करण्यात आला आहे. गोरे यांचं हे जुनं प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गोरे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसंच दमानिया या पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार असल्याचीही चर्चा आहे.

कोण आहेत जयकुमार गोरे?

  • १. जयकुमार गोरे पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील माण- खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २००९ला ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.
  • २. २०१४मध्ये जयकुमार गोरे काँग्रेस पक्षातून निवडून आले होते.
  • ३. २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला.
  • ४. जयकुमार गोरे आमदार होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.
  • ५. जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता ग्रामीण विकास मंत्री असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे.

काय आहे प्रकरण?

  • १. जयकुमार गोरे हे २०१६मध्ये आमदार असताना त्यांनी एका महिलेला त्रास देत, स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर संबंधित महिलेने सातारा पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
  • २. या तक्रारीनंतर गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी गोरेंना १० दिवस तुरूंगवासही झाला होता.
  • ३. त्यानंतर या प्रकरणात पुढे काहीही हालचाल झाली नाही. मात्र, संबंधित महिलेचे नाव आणि पत्ता अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आल्याचे तिने सांगितले. यानंतर महिलेने राज्यपालांना या प्रकरणाबाबत पत्र लिहिलं.
  • ४. संबंधित महिलेला या प्रकरणासंदर्भात काही पत्रंदेखील मिळाली होती, जी नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे ‘द विक’च्या वृत्तात म्हटले आहे.
  • ५. दुसरीकडे, गोरे यांनी स्वत:च्या बचावात न्यायालयाने त्यांना २०१९मध्येच निर्दोष मुक्त केल्याचे म्हटले आहे. “माझ्याकडे निकालाची प्रत आहे. निकालात न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने जप्त केलेले साहित्य आणि मोबाईल फोन नष्ट करण्याचे आदेशही दिले आहेत”, असे गोरे यांनी सांगितले. “न्यायालयाच्या निर्णयाला सहा वर्षे झाली आणि हे प्रकरण पुन्हा समोर आल्याने मला शंका येत आहे. राजकीय नेत्यांनी कोणत्या वेळी काय बोलावे याचे भान राखले पाहिजे”, असेही गोरे म्हणाले.

गोरेंच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, गोरे यांच्यावर महिलेने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केल्यामुळे विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. “गोरे यांनी या महिलेचा छळ केल्याची माहिती सर्वांसमोर आली आहे, तेव्हा अशा नेत्याला सभागृहातून हाकलून दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे . या प्रकरणी संबंधित महिलेला न्याय मिळाला नाही आणि गोरे यांची हकालपट्टी झाली नाही तर ती महिला येत्या काही दिवसांत विधान भवनासमोर आमरण उपोषण करेल असे संजय राऊत यांनी एका मुलाखतीत सांगितले.

तसंच भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करणार असा सावध पवित्रा घेतला आहे. तेव्हा धनंजय मुंडेंबाबत कडक कारवाई केल्यानंतर आता जयकुमार गोरे यांना भाजपा वाचवणार की त्यांच्यावर कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

आज गोरेंनी विधानसभेत यावरून संजय राऊत आणि रोहित पवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला, तो अध्यक्षांनी स्वीकारला असून हक्कभंग समितीकडे पाठवला आहे.