पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत संयुक्त भूमिका ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या जनता दल (सेक्युलर) ने सत्ताधारी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले. मुर्मु यांना पाठिंबा दिल्यास त्याकडे ‘भाजपाला पाठिंबा’ म्हणून पाहिले जाऊ नये हे अधोरेखित करताना, जेडी(एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की “द्रौपदी मुर्मू यांना आधीच पुरेसा पाठिंबा आहे आणि त्यांना आमच्या समर्थनाची गरज नाही, परंतु तरीही त्यांनी आमच्या समर्थनाची मागणी केली आहे आणि हे त्यांच्या चांगुलपणाचे लक्षण आहे.”

कुमारस्वामी यांनी असेही सांगितले की “मुर्मू यांनी माजी पंतप्रधान आणि जेडी(एस) सुप्रीमो एच.डी देवेगौडा यांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी दोनवेळा फोन केला होता. त्यांनी वैयक्तिकरित्या बंगळुरूला येण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना इथे येण्याची आवश्यकता नाही. माझ्या मते मुर्मू यांनी आधीच ही निवडणूक जिंकली आहे”.

जनता दल सेक्युलरचे संसदेत २ खासदार आहेत. राज्यसभेत देवेगौडा आणि लोकसभेत त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना. तसेच कर्नाटक विधानसभेत त्यांचे ३० आमदार आहेत. हे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. जेडीएसच्या या निर्णयावर काँग्रेसनी टीका केली आहे.

विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याऐवजी मुर्मू यांना जेडीएसने दिलेला पाठिंबा, हे पक्ष भाजपाशी जुळवून घेण्याचे किंवा भापापची ‘बी टीम’ असल्याचे लक्षण नाही, असे काँग्रेसने केलेल्या आरोपांना उत्तर देताना कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाची बी टीम असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” कुमारस्वामी म्हणाले की, आम्ही मुर्मु कुठल्या पक्षाच्या आहेत यापेक्षा विश्वासार्हतेमुळे त्यांना साथ देण्याचा निर्णय घेत आहोत.

२०१९ मध्ये जेडीएस आणि काँग्रेस आघाडी तुटल्यापासून काँग्रेस वारंवार भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करत आहे. कुमारस्वामी यांनी अलीकडच्या आठवड्यात भाजपावर जोरदार हल्लाबोल करून हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा, आरएसएस आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच बेंगळुरूला भेट देऊन शहरातील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले होते.