आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी यांसारख्या महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. बिहारमधील संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांचादेखील या आघाडीत समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयू पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. असे असतानाच त्यांनी भाजपातील नेते आमचे मित्र आहेत, असे विधान केले आहे. या विधानानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, आता खुद्द नितीश कुमार यांनीच माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, मी भाजपाशी हातमिळवणी करणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.
नितीश कुमार नेमके काय म्हणाले होते?
नितीश कुमार १९ ऑक्टोबर रोजी मोतिहारी येथे महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी झाले होते. यावेळी मंचावर त्यांच्यासोबत भाजपाचे नेतेदेखील होते. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी ‘भाजपाचे नेते आमचे मित्र आहेत, भविष्यातही ते मित्रच राहतील’ असे विधान केले होते. या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. नितीश कुमार भाजपाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, नितीश कुमार यांनी त्यांच्या या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. मी भाजपाशी हातमिळवणी करणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले आहेत.
माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला : नितीश कुमार
“माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्यामुळे मी दु:खी आहे. माझ्या विधानाचा योग्य तो संदर्भ घेण्यात आला नाही. महात्मा गांधी केंद्रीय विद्यापाठीच्या उभारणीसाठी मी किती प्रयत्न केले, याबाबत मी बोलत होतो. आमचा पक्ष तेव्हा एनडीएचा घटकपक्ष होता. मी भाजपातील माजी सहकाऱ्यांना माझ्या कामाची आठवण करून दिली. यात चुकीचे काय आहे?” असे नितीश कुमार म्हणाले. जदयू पक्षाचे नेते तथा मंत्री विजय कुमार चौधरी यांनीदेखील नितीश कुमार यांच्या या विधानाबाबत प्रतिक्रिया दिली. कुमार यांनी आमचे भाजपाच्या नेत्यांशी केवळ वैयक्तिक संबंध आहेत, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यामागे कोणतीही राजकीय बाब नव्हती, असे विजय कुमार चौधरी म्हणाले.
तेजस्वी यादव उत्तराधिकारी असल्याचे नितीश कुमार यांचे पुन्हा संकेत
यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव हे माझे उत्तराधिकारी असल्याचे पुन्हा एकदा संकेत दिले. याआधी गेल्या वर्षी त्यांनी नालंदा येथे बोलताना तेजस्वी यादव हे माझे उत्तराधिकारी असतील, असे अप्रत्यक्ष म्हटले होते. यासह माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मला फक्त विरोधकांच्या इंडिया आघाडीला आणखी मजबूत करायचे आहे, असेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.
उत्तराधिकारी कोण हे बिहारची जनताच ठरवेल : भाजपा
नितीश कुमार यांच्या विधानानंतर मात्र भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “आपण काय बोलत आहोत, याची नितीश कुमार यांनाच खात्री नाही. नितीश कुमार यांचा उत्तराधिकारी कोण आहे, हे बिहारची जनताच ठरवेल”, असे बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले. तर ‘नितीश कुमार हे दुटप्पी राजकारणी आहेत, जदयू पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत. भाजपाला आता नितीश कुमार यांची गरज नाही’, अशी प्रतिक्रिया भाजपाचे राज्यसभेचे खासदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले.
नितीश कुमार यांच्या विधानामुळे आश्चर्य वाटले नाही : काँग्रेस
बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी नितीश कुमार यांच्या विधानामुळे आम्हाला कसलेही आश्चर्य वाटलेले नाही; नितीश कुमार यांनी याआधीही तेजस्वी यादव यांना भविष्यातील मुख्यमंत्री म्हटलेले आहे. २०२० साली आम्ही जदयू पक्षाशी युती करून निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत आम्हीदेखील तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे जनतेला सांगितले होते, असे अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले.
“तेजस्वी यादव यांच्यात बिहारचा विकास करण्याची क्षमता”
राजद पक्षाचे प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनीदेखील नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्याविषयी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “तेजस्वी यादव परिपक्व राजकारणी आहेत. याच कारणामुळे नितीश कुमार यांनी त्यांना उत्तराधिकारी म्हणून संबोधले आहे. विरोधकांच्या आघाडीला फायदा व्हावा म्हणून तेजस्वी यादव आणि लालूप्रसाद यादव यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी केली. बिहारचा विकास करण्याची क्षमता तेजस्वी यादव यांच्यात आहे, याची नितीश कुमार यांना कल्पना आहे”, असे मत राजदने व्यक्त केले.