२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी देशपताळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ अर्थात INDIA असे नाव ठवले आहे. या आघाडीमध्ये एकूण २६ पक्षांचा समावेश आहे. १७-१८ जुलै रोजी विरोधकांची बंगळुरू येथे दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला वरील नाव देण्यात आले. दरम्यान, ही बैठक यशस्वी झाली असली तरी बिहारचे मुख्यमंत्री तथा जदयू पक्षाचे नेते नितीश कुमार काहीसे नाराज असल्याचे म्हटले जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी नाराज नाही- नितीश कुमार

बंगळुरूच्या बैठकीत काँग्रेसने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच विरोधकांच्या आघाडीला INDIA असे नाव देण्यात आल्यामुळेही नितीश कुमार नाराज असल्याचे म्हटले होते. मात्र ही बैठक पार पडल्यानंतर बुधवारी (१९ जुलै) नितीश कुमार यांनी माध्यमांसमोर नाराजीवरच्या चर्चेबद्दल प्रतिक्रिया दिली. मी नाराज नाही. २३ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत फक्त १५ विरोधी पक्ष होते. मात्र बंगळुरू येथे पार पडलेल्या बैठकीत एकूण २६ पक्षांची उपस्थिती होती, असे नितीश कुमार माध्यमांशी बोलताना सांगितले.

“…म्हणून मी तेथून लगेच निघालो”

“मी नाराज असल्याची चर्चा कोण करतं हे मला समजत नाही. मला दुसऱ्या ठिकाणी जायचे होते, त्यामुळे बंगळुरू येथील बैठक संपल्यानंतर मी तेथून लगेच निघालो. तसेच बंगळुरूतील विरोधकांच्या पत्रकार परिषदेत प्रत्येकाला बोलणे शक्य नव्हते. या बैठकीत सर्वकाही सुरळीत पार पडले, याचा मला आनंद आहे. याआधी पाटण्यातील बैठकीत एकूण १५ पक्ष उपस्थित होते. तर बंगळुरू येथील बैठकीत एकूण २६ पक्षांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीत आपल्या आघाडीत आणखी काही पक्षांचा समावेश करावा, असे मी सुचवले. इतर पक्षांनीदेखील अनेक सूचना केल्या,” असे नितीश कुमार यांनी सांगितले.

नितीश कुमार यांची भाजपावर टीका

नितीश कुमार विरोधकांच्या आघाडीला INDIA असे नाव देण्याच्या विरोधात होते, असा दावा केला जातोय. यावरही नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. “मी नाराजी होण्याचा काहीही प्रश्न नाही. आमच्या आघाडीमुळे एनडीएचे (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) घटक पक्ष कशी प्रतिक्रिया देत आहेत, ते पाहावे. ते आमच्या बैठकीत ३८ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, असा दावा करत आहेत. मात्र ते बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षांची नावे सांगू शकतात का? आमच्या आघाडीपूर्वी एनडीए अशा प्रकारच्या बैठका आयोजित करत होती का? आमच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. आमची आघाडी झाल्यानंतर भाजपा बैठका बोलावत आहे,” असेही नितीश कुमार म्हणाले.

“मी अशा कोणत्याही स्पर्धेत नाही”

विरोधकांची पुढची बैठक मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीच्या निमंत्रकाची निवड केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर INDIA च्या निमंत्रक पदाच्या शर्यतीत तुम्ही आहात का? असा प्रश्न नितीश कुमार यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना “मी अशा कोणत्याही स्पर्धेत नाही. मी कोणत्याही पदाच्या शर्यतीत नाही. तसेच मला कोणतीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. सर्वकाही सुरळीत सुरू आहे. याचेच मला समाधान आहे,” असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

भाजापचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी विरोधकांच्या बंगळुरू येथील बैठकीत नितीश कुमार यांना योग्य तो सन्मान देण्यात आला नाही, असा दावा केला होता. यावरही नितीश कुमार यांनी भाष्य केले. सुशील कुमार मोदी आमच्यासोबत बंगळुरुच्या बैठकीत होते का? असा खोचक सवाल त्यांनी केला.

“आम्हाला पुढच्या ठिकाणी विमानाने लवकर जायचे होते”

नितीश कुमार यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर जदयू पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार राजीव रंजन सिंह यांनीही स्पष्टीकरण दिले. “आम्हाला पुढच्या ठिकाणी विमानाने लवकर जायचे होते. त्यामुळे आम्ही बैठकीच्या ठिकाणाहून लवकरच निघालो,” असे राजीव रंजन सिंह यांनी सांगितले.

“बहुतेक पक्षांनी नावाला पाठिंबा दिल्यामुळे…”

असे असले ती विरोधकांच्या बैठकीत राजद पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, जदयू पक्षाचे नेते नितीश कुमार यांना योग्य सन्मान मिळालेला नाही, अशी भावना जदयू पक्षातील काही नेत्यांची आहे. “आमच्या आघाडीचे नाव INDIA असे ठवले असले तरी फारसा फरक पडणार नाही. हे नाव विरोधकांच्या ‘एनडीए’प्रमाणेच भासते. आमच्या आघाडीचे नाव थोडे मोठेदेखील आहे. मात्र या नावाला बहुतेक नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे आम्हीदेखील हे नाव मान्य केले. नितीश कुमार यांनी ज्या कामासाठी पुढाकार घेतला होता, त्याचे फळ आता दिसत आहे, याचा आम्हाला आनंद आहे,” असे मत जदयू पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केले.

आघाडीच्या बैठकीवर राजद पक्षाचे मत काय?

दरम्यान, बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीबाबत राजद पक्षानेदेखील नितीश कुमार यांच्याप्रमाणेच मत व्यक्त केले. “आमची आघाडी एका निर्णायक वळणावर आल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही आमच्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. हे नाव देऊन आम्ही भाजपाच्या भारताच्या संकुचित संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आमच्या भारताची संकल्पना ही सर्वसमावेशक आहे,” असे राजद पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध कुमार मेहता म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu leader nitish kumar said not upset over bengaluru opposition meeting prd