जनता दलाच्या खासदाराचा एक वादग्रस्त व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नवनिर्वाचित जेडी(यू) खासदार देवेशचंद्र ठाकूर यादव आणि मुस्लिमांबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. सीतामढीचे खासदार ठाकूर यांनी मुसलमान आणि यादव समुदायातील लोकांची कामे करणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. “माझ्याकडे येणाऱ्या यादव आणि मुस्लिमांचे स्वागत आहे. मी त्यांना चहा आणि मिठाई देऊ शकेन, पण मी त्यांच्यासाठी कोणतेही काम करणार नाही,” असे ठाकूर सीतामढी येथील एका कार्यक्रमात म्हणाले.

त्यांच्या वक्तव्यावर केवळ प्रतिस्पर्धी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) कडूनच नाही तर मित्रपक्ष भाजपा आणि त्यांच्या पक्षाचे बांका खासदार यांच्याकडूनही तीव्र टीका करण्यात आली आहे. आरजेडी नेते मृत्युंजय तिवारी यांनी त्यांच्या वक्तव्याला ‘जातीवादी’ म्हटले, तर भाजपाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस निखिल आनंद म्हणाले की, “राज्याच्या १४ टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या यादवांकडे कोणताही राजकीय पक्ष दुर्लक्ष करू शकणार नाही.” जेडी(यू)चे बांका खासदार गिरीधारी यादव यांनी ठाकूर यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी केली.

हेही वाचा : लोकसभेच्या अध्यक्षपदावरून ‘एनडीए’त मतभेद? कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष?

जेडी(यू)चे मुख्य प्रवक्ते आणि एमएलसी नीरज कुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, समाजातील काही घटकांकडून पाठिंबा न मिळाल्याने एखाद्या नेत्याला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, देवेशचंद्र ठाकूर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने सार्वजनिक ठिकाणी असे वादग्रस्त वक्तव्य करणे अपेक्षित नाही.

कोण आहेत देवेशचंद्र ठाकूर?

सीतामढीचे रहिवासी असलेले ठाकूर हे जेडी(यू)ने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेले पहिले उमेदवार होते. जेडी(यू)च्या या घोषणेने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती, कारण पक्षाने ओबीसी वैश्य असलेल्या विद्यमान खासदार सुनील कुमार पिंटू यांना तिकीट नाकारले. ठाकूर हे जेडी(यू)कडून तिकीट मिळवणारे एकमेव उच्चवर्णीय ब्राह्मण ठाकूर आहेत. त्यांना सीतामढ़ी येथून ५१,३५६ मतांनी विजय मिळाला. सीतामढ़ीत मुस्लीम आणि यादव मतदारांची संख्या लक्षणीय आहे. ठाकूर यांना ४७.१४ टक्के मते मिळाली, तर आरजेडीच्या अर्जुन राय यांना ४२.४५ टक्के मते मिळाली.

२००९ पासून, सीतामढीमध्ये केवळ जेडी(यू) किंवा एनडीए मित्रपक्षातील नेतेच विजयी झाले आहेत. २०१९ मध्ये पिंटू यांना ५४.६५ टक्के तर त्यांच्या विरुद्ध उभ्या असलेल्या राय यांना ३०.५३ टक्के मते मिळाली होती. २०१४ मध्ये, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे राम कुमार शर्मा यांनी ४५.६७ टक्के मते मिळवून आरजेडीचे सीताराम यादव यांच्या विरोधात विजय मिळवला, ज्यांना २९.२४ टक्के मते मिळाली.

ठिकठिकाणी टीकेची झोड उठल्यानंतरही ठाकूर या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत. “मी २५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी सर्वांसाठी काम केले आहे. मला जे वाटले ते मी सांगितले. मला या दोन समाजाचा पाठिंबा मिळाला नाही. मी त्यांच्या विरोधात नाही, पण मी त्यांचे वैयक्तिक काम करू शकत नाही, असे ठाकूर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

ठाकूर यांचे वडील अवध ठाकूर हे एक प्रसिद्ध वकील होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांनीही पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीमधून एलएलबी पदवी प्राप्त केली. १९९० ते १९९६ पर्यंत ते काँग्रेस पक्षात होते, पण शिपिंग कंपनीत काम करण्यासाठी त्यांनी राजकारण सोडले. २००२ मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून निवडून येत राजकारणात परतले.

हेही वाचा : भाजपाला पसमांदा मुस्लिमांची मतं का मिळाली नाहीत?

२००८ मध्ये ठाकूर जेडी(यू)मध्ये सामील झाले, त्यानंतर ते बिहारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री झाले. त्यांनी २००० पासून बिहार दिवस साजरा करण्याची मागणी केली आणि २०१० मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून याला मान्यता देण्यावर दबाव आणला. ठाकूर यांनी २०१२ मध्ये राज्याबाहेर राहणाऱ्या बिहरींसाठी कार्यक्रम आयोजित केले होते. २०१४ मध्ये ठाकूर यांना पुन्हा अपक्ष आमदार म्हणून नामांकन देण्यात आले. ऑगस्ट २०२२ मध्ये ते बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष झाले.