विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे सध्या भाजपाची सत्ता असून, शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्रिपदी आहेत. येथे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीदरम्यान इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून मोठा वाद झाला. असे असतानाच आता इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उतरला आहे.
समाजवादी पार्टी, काँग्रेसमध्ये वाद
काही दिवसांपासून मध्य प्रदेशच्या निवडणुकीमुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वाद चालू आहे. समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये जनाधार नाही. त्यामुळे या पक्षाने आपले उमेदवार उभे न करता, काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसने केले होते. त्यानंतर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर थेट टीका केली होती. परिणामी या दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली. सध्या समाजवादी पार्टी हा पक्ष मध्य प्रदेशमध्ये २५ पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवत आहे.
हेही वाचा : ग्वाल्हेरमध्ये प्रचारासाठी ‘शिंदे’ महाराज जमिनीवर
जदयू पक्षाची मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उडी
इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टी अर्थात आप या पक्षानेदेखील मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला मतफुटीला सामोरे जावे लागू शकते. याच कारणामुळे काँग्रेसला भाजपाविरोधात लढाई करताना आणखी जोर लावावा लागण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानेही (जेडीयू) मध्य प्रदेशची निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे.
“आम्ही काँग्रेससशी चर्चा केली; मात्र…”
जेडीयू पक्षाने मध्य प्रदेशमध्ये १० जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. याआधी समाजवादी पार्टीने काँग्रेस पक्षाशी जागावाटप होऊ शकले नाही, असे सांगितले होते. त्यानंतर आता जदयू पक्षानेदेखील काँग्रेस पक्षाशी आम्ही जागावाटपावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यावर तोडगा निघू शकला नाही, असे सांगितले. जदयू पक्षाचे सल्लागार व मुख्य प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. आम्ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसेच मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्याशी जागावाटपावर चर्चा केली; मात्र ही चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत आमचा पक्ष सक्रिय आहे. आम्हाला सामावून घेणे हे पूर्णपणे काँग्रेसवर अवलंबून होते. मात्र तसे झाले नाही, अशी प्रतिक्रिया त्यागी यांनी दिली.
“२००३ सालापासून आम्ही मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवतो”
जदयू पक्षाचे आमदार व राष्ट्रीय सरचिटणीस आफाक अहमद यांनी याच मुद्द्यावर ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. “२००३ सालापासून आम्ही मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवतो आहोत. फक्त २०१८ साली आम्ही निवडणूक लढवली नव्हती. २००२ साली आमचे कटनी येथील उमेदवार बच्चन नाईक विजयी झाले होते. २००८ साली नाईक यांच्या पत्नी सरोज बच्चन यांचा विजय झाला होता. २००३ साली जदयूने एकूण १० जागा लढवल्या होत्या. २००८ व २०१३ सालीदेखील सुमारे १० जागा लढवल्या होत्या. २०१८ साली आमचे तेव्हाचे सहकारी भाजपाने विनंती केल्यानंतर आम्ही निवडणूक लढवली नव्हती,” असे अहमद यांनी सांगितले.
हेही वाचा : माझ्यामध्ये खरे बोलण्याचे धाडस – मध्य प्रदेशचे गृहमंत्री व मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक नरोत्तम मिश्रा
“आमची युती फक्त लोकसभा निवडणुकीसाठी”
लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक इंडिया आघाडीच्या रूपात एकत्र आले आहेत. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. हे विरोधक लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले असले तरी वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मात्र परिस्थिती वेगळी आहे. राज्य पातळीवरच्या निवडणुकीसाठी या पक्षांत मतभेद आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंडिया आघाडीतील आप, जदयू, समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशमध्ये उमेदवार उभे केले आहेत. यावरही त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली. “आमची आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढत आहोत,” असे त्यागी म्हणाले.
मणिपूर, नागालँडमध्ये जदयूचा प्रत्येकी एक आमदार
काँग्रेसने मात्र याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. सध्या जदयू पक्षाचे बिहारमध्ये ४५ आमदार आहेत. त्याव्यतिरिक्त नागालँड व मणिपूर या राज्यांतही या पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे.