महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेची निवडणूक होत आहे. झारखंडमध्ये विद्यमान सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा आणि इंडिया आघाडीने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षानेही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही पक्षाच्या जाहिरनाम्यात कल्याणकारी योजनांना विशेष स्थान देण्यात आले आहेत. या योजनांद्वारे आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात २५ आश्वासने दिली आहेत. तर इंडिया आघाडीने सात आश्वासने दिली आहेत. इंडिया आघाडीने कर्नाटक आणि तेलंगणा निवडणुकीत जी शक्कल राबविली होती, त्याची पुनरावृत्ती झारखंडमध्ये केली आहे.
दलित, आदिवासी आणि ओबीसींपर्यंत पोहण्याचे प्रयत्न
आदिवासींच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्यासाठी, संस्कृती आणि कलेचे जतन करण्यासाठी संशोधन केंद्र निर्माण करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच बिरसा मुंडासारख्या आदिवासी वीरांचा गौरव करणार असल्याचेही सांगितले आहे. समान नागरी कायद्याच्या संहितेमधून आदिवासींना सूट देणे आणि झारखंडच्या आदिवासीबहुल संथाल परगणामधील कथित घुसखोरीचा कायमचा निकाल लावण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.
तर दुसरीकडे इंडिया आघाडीने आदिवासींना २८ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. या माध्यमातून सामाजिक न्यायाचे तत्व जपण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीने केला आहे. दलितांसाठी १२ टक्के आणि २७ टक्के ओबीसींसाठी आरक्षण आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्याचे वचन आघाडीने दिले आहे. यासह राज्यात मागासवर्गीय कल्याण मंत्रालय स्थापन करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
भाजपानेही एससी आणि एसटी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याचे वचन दिले आहे. तसेच ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
महिलांसाठी आश्वासने काय?
महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात महिलांना प्रति महिना काही रक्कम देण्याची स्पर्धा लागली आहे. याचा भाग म्हणून भाजपाने झारखंडमध्ये गोगो दीदी योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना २,१०० रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सर्व कुटुंबांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आणि वर्षाला दोन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.
इंडिया आघाडीने मय्या सन्मान योजनेचे आश्वासन दिले असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना २,५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच प्रति व्यक्ती ७ किलो रेशन आणि गरीब कुटुंबासाठी ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.
शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना
भाजपाने धानाला प्रति क्विंटल ३,१०० रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच लहान आणि अत्यल्प शेतकरी आणि पशुपालकांना प्रति एकर ५,००० रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे.
इंडिया आघाडीने यामध्ये भाजपावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले आहेत. इंडिया आघाडीने धानाला २,४०० रुपयांवरून ३,२०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.