झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक आहे, त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून ६६ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही यादी जाहीर होताच भाजपाच्या अनेक पदाधिकारी आणि आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत पदाचा राजीनामा दिला आहे. उमेदवार यादी जाहीर करताना निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावलत पक्षाने आयात उमेदवार आणि घराणेशाहीला प्राधान्य दिलं असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात बोलताना भाजपाच्या एका नेत्याने सांगितलं की, उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पक्षात नाराजी नक्कीच आहे. त्याचे परिणाम पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत भोगावे लागण्याची शक्यता आहे. नेत्यांचं अशाप्रकारे पक्ष सोडून जाण्याने कार्यकर्त्यांमधील उत्साहसुद्धा कमी झाला आहे.

भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर जवळपास १२ पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापैकी काहींनी झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला आहे, तर काही अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी तीन माजी आमदारांनी हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला आहे. यामध्ये लोईस मरांडी, कुणाल सारंगी, लक्ष्मण टुडू यांचा समावेश आहे. यापूर्वी तीन वेळा आमदार राहिलेले केदार हजारा तसेच उमकांत रजक यांनीही भाजपातून झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला. केदार हजारांना पक्षाने जामुआमधून उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!

झारखंडचे माजी मंत्री तथा भाजपा नेते लोईस मरांडी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांना भावनिक पत्र लिहिलं आहे. ”पक्षात सध्या गटबाजीचं वातावरण आहे. वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक नेत्यांनी ज्याप्रकारे माझ्यावर आरोप केले, त्याने माझ्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळेच मी माझ्या पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

याशिवाय अन्य एक भाजपा नेते, ज्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला ते म्हणाले, तुम्ही पक्षाची उमेदवार यादी बघितली तर निष्ठवान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे दिसून येईल. ६६ पैकी जवळपास ५० टक्के उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत, त्यामुळे पक्षात असंतोषाची भावाना निर्माण झाली आहे.

ज्या नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, त्यात सत्यानंद बटलू, मिस्री सोरेन, संदीप वर्मा, गणेश महली या नेत्यांचा समावेश आहे. भाजपाने पक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. जो पक्ष दुसऱ्या पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करतो, तोच पक्ष आता घराणेशाहीला बळी पडला आहे, त्यामुळे आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं ते म्हणाले.

हेही वाचा – पहिल्याच दिवशीच्या अर्ज विक्रीतून विदर्भात हरियाणा पॅटर्नचे संकेत, ६२ जागांसाठी २ हजारांवर अर्ज विक्री

भाजपाने ६६ उमेदवारांच्या यादीनुसार माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची सून पोर्णिमा दास साहू, अर्जून मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा, चंपई सोरेन यांचे चिरंजीव बाबूलाल सोरेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एडीएच्या जागावाटपानुसार भाजपाने आधीच ८१ पैकी ६६ जागा लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे, तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. भाजपाचे नेते संदीप वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली. भाजपा जर त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार नसेल तर मी अपक्ष निवडणूक लढेन, असं ते म्हणाले.

दरम्यान, भाजपा नेत्यांच्या नाराजीबाबत पक्षाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जिंकण्याची क्षमता या एका निकषावरच उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच पक्षात कोणतीही नाराजी नसून निवडणुकीपूर्वी छोटे-मोठे पक्षांतर होत असतात. मात्र, त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रियाही पक्षाकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jharkhand assembly election bjp leader resign after list of candidate out spb