सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने झारखंडचे अर्थमंत्री रामेश्वर उरांव यांच्या निवासस्थानावर बुधवारी (२३ ऑगस्ट) छापेमारी केली. कथित मद्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही करावाई करण्यात आली. या कारवाईनंतर काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपा सध्या सुडाचे राजाकरण करत आहे, असे काँग्रेसने म्हटले.

झारखंडमध्ये अनेक जिल्ह्यांत छापेमारी

बुधवारी ईडीने झारखंडमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात रांची, डुममका, देवघर, गोड्डा तसेच इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. ईडीने ज्या ठिकाणी छापेमारी केली, त्या उद्योगांत उरांव यांचे पुत्र रोहित यांनी गुंतवणूक केली असा आरोप केला जातो. रोहित हे त्यांचे वडील उरांव यांच्यासोबतच राहतात. ईडीने छापेमारी करण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

“काय आढळले हे ईडीने स्पष्ट करायला हवे”

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आलोक दुबे हे उरांव यांचे निटकवर्तीय मानले जातात. ईडीच्या छापेमारीदरम्यान ते उरांव यांच्या निवासस्थानाबाहेर उपस्थित होते. या कारवाईनंतर “नेमके काय सापडले, हे इडीने स्पष्ट करायला हवे. रामेश्वर उरांव हे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी अनुसूचित जमाती आयोगाचे नेतृत्व केलेले आहे. त्यांच्याकडे सध्या सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे. रोहित उरांव हेदेखील कोणताही कलंक नसलेले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत,” अशी प्रतिक्रिया दुबे यांनी दिले.

“छापेमारी हे हतबलतेचे लक्षण”

काँग्रेसचे रांची महानगर अध्यक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे माजी संयोजक कुमार राजा यांनीदेखील ईडी आणि भाजपावर टीका केली आहे. “जेव्हा जेव्हा राजकीय परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे भाजपाला लक्षात येते, तेव्हा तेव्हा भाजपा येथे ईडीच्या मदतीने राजकारण करते. मद्य घोटाळा काय आहे? याबाबत आम्हाला कसलीही कल्पना नाही. रामेश्वर उरांव यांच्या निवासस्थानी छापेमारी करणे हे हतबलतेचे लक्षण आहे,” असे कुमार राजा म्हणाले.

“मद्यविक्री फक्त झारखंड, दिल्ली, छत्तीसगडमध्येच होते का?”

झारखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनीदेखील या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. “ईडी अशा प्रकारची कारवाई संपूर्ण देशभरात करत आहे का? मद्य फक्त झारखंड, दिल्ली, छत्तीसगड या राज्यांतच मद्य विकले जात आहे का? भाजपाशासित राज्यांत मद्यघोटाळा नाहीये का?” असे सवाल त्यांनी केले.

उरांव माजी आयपीएस अधिकारी, कन्या आयआरएस अधिकारी

दरम्यान रामेश्वर उरांव यांच्याकडे राज्याचे अर्थमंत्रीपद आहे. ते लोहरडागा (एसटी) मतदारसंघातून आमदार आहेत. ते १९७२ च्या बॅचचे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते केंद्रात मंत्री होते. उरांव यांची कन्या निशा या २००८ सालच्या बॅचच्या आयआरएस अधिकारी आहेत. त्या सध्या झारखंड राज्यात पंचायती राज विभागाच्या संचालक आहेत. ईडीने याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स पाठवलेले आहे. मात्र ते अद्याप ईडीसमोर हजर झालेले नाहीत.

Story img Loader