माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच नवनियुक्त मुख्यमंत्री चंपई सोरेन आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्राही आज झारखंडमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकार विरोधात धरणा आंदोलन करतील, तर राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही भाजपाविरोधात निदर्शने करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, आजच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया.
झारखंडच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांचा शपथविधी :
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज सकाळी १०.३० वाजता न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एम.एम. सुंद्रेश आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. याबरोबरच माजी मु्ख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडले आहे. ते आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. झारखंड विधानसभेची एकूण संख्या ८१ असून झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला सध्या ४८ आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये सीपीआय-एमएल (लिबरेशन)च्या एका आमदाराचाही समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे धरणा आंदोलन :
केंद्रातील मोदी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत मिळणारा निधी रोखल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. याविरोधात ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. मागील दोन वर्षांपासून हा मुद्दा बंगालमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. गेल्यावर्षी टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी याच मुद्द्यावरून दिल्लीत आणि कोलकात्यातील राजभवनसमोर बसून धरणे आंदोलन केले होते.
दिल्लीत भाजपा-आपचे एकमेकांविरोधात निदर्शने :
राजधानी दिल्लीत आज आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलने करणार आहेत. चंदीगडमधील महापौर निवडणुकीत झालेल्या प्रकाराच्या मुद्द्यावर आपकडून भाजपा पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. तर भाजपा अरविंद केजरीवाल यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात आंदोलन करणार आहेत.
राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ झारखंडमध्ये :
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्राही आज झारखंडमध्ये दाखल होईल. यावेळी राहुल गांधी पाकूर जिल्ह्यात सभेला संबोधित करतील. ही यात्रा झारखंडमध्ये १३ जिल्ह्यातून ८०४ किमीचा प्रवास करेल. १४ जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा ६७ दिवसांत ६७१३ किलोमीटरचा प्रवास करणार आहे.