माजी मु्ख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडले होते. आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. झारखंड विधानसभेची एकूण सदस्य संख्या ८१ असून झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीकडे सध्या ४८ आमदारांचा पाठिंबा आहे. दरम्यान, झारखंड राज्यनिर्मिती चळवळीतील कार्यकर्ता ते माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे विश्वासू अशी ओळख असलेले चंपई सोरेन आहेत तरी कोण? आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे? याविषयी जाणून घेऊया.
मुख्यमंत्रिपदासाठी चंपई सोरेन यांची निवड का?
चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते मागील सरकारच्या मंत्रिमंडळात वाहतूक मंत्रीही होते. तसेच ते हेमंत सोरेन याचे वडील आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. शिवाय हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर पक्ष फुटू नये, यासाठी त्यांची सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा – “तामिळनाडूमध्ये सीएए कधीही लागू होऊ देणार नाही”, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे मोठे विधान
कोण आहेत चंपई सोरेन?
झारखंडच्या सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोडा गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात चंपई सोरेन यांच्या जन्म झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. कमी वयातच त्यांनी वेगळ्या झारखंड राज्यनिर्मितीच्या चळवळीत सहभाग घेतला. त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजकारणात येण्यापूर्वीच गावाचा विकास आणि आदिवासींच्या कल्याणासाठी कार्य सुरू केले होते. ७० च्या दशकात वेगळ्या राज्याची चळवळ जोमात असताना त्यांनी स्वत:ला झारखंड राज्यनिर्मितीच्या चळवळीत झोकून दिले. १९९० साली चंपई सोरेन यांनी झारखंडमधील असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी केलेले आंदोलनही प्रचंड गाजले होते.
चंपई सोरेन यांची राजकीय कारकीर्द :
चंपई सोरेन यांनी १९९५ साली पहिल्यांदा सरायकेला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. पण, या पराभवानंतर पुढच्या सलग चार निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.
चंपई सोरेन यांची संपत्ती :
चंपई सोरेन यांच्या संपत्तीबाबत बोलायचं झाल्यास, त्यांनी २०१९ साली निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ८०.२७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता, तर ४८.९१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्या बॅंक खात्यात ४२.९० लाख रुपये रोख असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच त्यांच्यावर २४.०४ लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यातही २६.१८ लाख रुपये रोख आहेत.