Bypoll to Jharsuguda Assembly constituency : ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबकिशोर दास यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी मंत्र्यांची हत्या केली. नबकिशोर दास यांचे निधन झाल्यानंतर आता झारसुगुडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होईल. २९ जानेवारी रोजी मतदारसंघातील ब्रजराजनगर येथे एका कार्यक्रमाला जात असताना पोलीस कर्मचाऱ्याने अतिशय जवळून नबकिशोर दास यांच्यावर गोळी झाडली. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकीची अधिसूचना १३ एप्रिल रोजी निघणार आहे. २० एप्रिलपर्यंत उमेदवारांना त्यांचे अर्ज दाखल करता येतील. नबकिशोर दास यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर याठिकाणी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी सत्ताधारी बिजू जनता दल (BJD) पक्षात प्रवेश करून पुन्हा विजय मिळवला. २०१९ साली त्यांनी ४५ हजार ६९९ इतके मताधिक्य घेऊन विजय मिळवला होता. ओडिशामधील लोकप्रिय नेते असलेल्या दास यांचा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्रिमंडळात समावेश केला.
हे वाचा >> ओडिशातील मंत्र्याच्या हत्येमागे कट? भाजपचा आरोप, सीबीआय चौकशीची मागणी
नबकिशोर दास यांची हत्या झाल्यानंतर लगेचच बीजेडी आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी पोटनिवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम राबविले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीजेडी पक्ष नबकिशोर दास यांची मुलगी दीपाली दास यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी करत आहे. २६ वर्षीय दीपाली यांनी नबकिशोर दास यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांना याआधी हजेरी लावली होती. तसेच वडीलांकडून होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्याचे काम त्या करत होत्या. मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्याचे काम त्या सातत्याने करत आल्या आहेत. तसेच मतदारसंघातील विकासकामांची प्रगती जाणून घेण्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या बैठकातदेखील हजेरी लावलेली आहे.
भाजपाकडून देखील तरूण उमेदवार देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष टंकाधर त्रिपाठी (Tankadhar Tripathy) यांना या पोटनिवडणुकीसाठी तिकीट देण्यात येत आहे. झारसुगुडा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना त्रिपाठी यांनी हजेरी लावलेली आहे. नुकतेच त्यांनी मतदारसंघातील काही प्रलंबित विषयांबाबत निषेध मोर्चा काढला होता. या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे उमदेवार दिनेश कुमार जैन यांना ५२,९२१ मतदान मिळवले होते. जर बीजेडीने दीपाली दास आणि भाजपाने त्रिपाठी यांना उमेदवारी दिल्यास, दोघांचीही ही पहिलीच निवडणूक ठरेल.
हे ही वाचा >> ७० वाहने, ३ बंदूका अन् शनि शिंगणापूरला १ कोटी रुपयांचं दान; गोळीबारात मृत्यू झालेले नबकिशोर दास कोण होते?
काँग्रेस पक्षाकडून मात्र उमेदवारीसाठी कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच उमेदवार तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. झारसुगुडा मतदारसंघात २.२ लाख मतदार आहेत. या मतदारंसघात झारसुगुडा महानगरपालिका आणि झारसुगुडा, किरमिरा, लैकेरा आणि कोलाबिरा हे चार ब्लॉक्स येतात. कोळसा खाणींसाठी हा मतदारसंघ ओळखळा जातो. दास यांची झालेली हत्या आणि ओडिशा पोलिसांचे अपयश हे या निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा असणार आहे.