आरजेडी पक्षाचे नेते चंद्रशेखर यांनी जानेवारी महिन्यात रामचरितमानस ग्रंथावरून केलेल्या टिप्पणीमुळे बिहारमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. या विषयाचे पडसाद बाजूच्या उत्तर प्रदेश राज्यातही उमटले. हे प्रकरण मागे पडलेले असतानाच आता बिहारमधील महायुतीचा घटकपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा-सेक्यूलर (एचएएमएस) पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी रामचरितमानस वाद तसेच प्रभु राम यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. प्रभु राम हे काल्पनिक पात्र आहे, असे जितन राम मांझी म्हणाले आहेत.
हेही वाचा >> विरोधकांच्या एकजुटीचे भाजपपुढेच आव्हान
प्रभु राम यांच्या तुलनेत रावण धार्मिक प्रथा, विधी काटेकोरपणे पाळायचा
जितन राम मांझी शुक्रवारी (१८ मार्च) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. या वेळी त्यांनी रामचरितमानस, प्रभु राम, रावण यांच्यावर भाष्य केले. “प्रभु राम आणि रावण ही काल्पनिक पात्रे आहेत, असे मी नेहमीच म्हणत आलो आहे. ही काल्पनिक पात्रे असली तरी प्रभु राम यांच्या तुलनेत रावण धार्मिक प्रथा, विधी काटेकोरपणे पाळायचा. संकटाच्या काळात राम यांना नेहमीच दैवी शक्तींची मदत मिळाली, तर रावणाला नेहमीच स्वत:चा बचाव करावा लागला,” असे जितन राम मांझी म्हणाले.
हेही वाचा >> नामांतराच्या विरोधातील आंदोलन मागे तर उद्या मोर्चा
हे मनुवादी विचारसरणीचे लक्षण आहे का?
“प्रभु राम यांचा मुद्दा पुन्हा पुन्हा उपस्थित केला जातो, कारण हा एक आस्थेचा विषय आहे. रामचरितमानस हे एक चांगले पुस्तक आहे. या पुस्तकात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. मात्र या पुस्तकातील काही बाबी वगळण्यात याव्यात असे डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,” असे जितन राम मांझी म्हणाले. तसेच, “रामचरितमानस लिहिणाऱ्या तुलसीदास यांच्याबद्दल आदर दाखवला जातो. मात्र तेवढाच आदर रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी यांच्याबाबत दाखवला जात नाही. हे मनुवादी विचारसरणीचे लक्षण आहे का?” असा प्रश्नही त्यांनी केला.
…कारण ते उच्च जातीतील आहेत
प्रभु राम यांच्याविषयी मी जेव्हा भाष्य करतो तेव्हा अनेक प्रतिक्रिया उमटतात. मात्र याआधी बाळ गंगाधर टिळक, राहुल सांस्कृत्यायन, जवाहरलाल नेहरू यांनीदेखील कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रभु राम यांच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मात्र त्यांच्याविषयी कोणीही प्रश्न विचारत नाही. कारण ते उच्च जातीतील आहेत. म्हणूनच मी प्रभु राम यांच्याविषयी काही म्हणालो की टीका केली जाते. असे का? असा प्रश्न जितन राम मांझी यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >> देव एकच, उपासनापद्धती वेगवेगळ्या- मोहन भागवत
दरम्यान, त्यांनी आरजेडी पक्षाचे चंद्रशेखर यांनादेखील पाठिंबा दिला. चंद्रशेखर यांनी रामचरितमानस ग्रंथातील काही भाग काढून टाकावा, अशी मागणी केली होती. जितन राम मांझी यांच्या विधानामुळे बिहारमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.