जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडताच गेले वर्षभर गुन्हे, चौकशा, अटकेची टांगती तलवार असतानाही राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या बंडानिमीत्त सत्तेत सहभागी होण्याची नामी संधी झिडकारल्याचे पहायला मिळत आहे. साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी उरकताच दादांविरोधात उघडपणे रस्त्यांवर उतरुन लाखोल्या वाहणाऱ्यात आव्हाड आघाडीवर होते. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात रविवारी झालेल्या बंडापासून चार हात लांब रहात आव्हाडांनी पुन्हा एकदा आपल्या निष्ठा थोरल्या पवारांच्या चरणी वाहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

वर्षभरापुर्वी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांच्यासोबत मंत्री पद उपभोगणारे आव्हाड अचानक विरोधी पक्षात आले आणि तेव्हापासून त्यांच्या वाट्याला सरकारवास सुरु झाला. ठाणे महापालिकेत वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता असली तरी शिंदे आणि आव्हाड यांच्यात मात्र नेहमीच समन्वयाचे चित्र पहायला मिळाले. आव्हाडांच्या कळवा-मुंब्र्यातील विकासकामांची रसद थोरल्या शिंदेनी कधीच बंद होऊ दिली नाही. खासदार श्रीकांत शिंदे यांचे राजकारणातील महत्व वाढत गेले तसे थोरले शिंदे आणि आव्हाडांचे संबंधही दुरावू लागले. मुख्यमंत्री पद येताच हे संबंध इतके ताणले गेले की आव्हाडांची चहुबाजूंनी कोंडी सुरु झाली. शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुरुवातीला लक्ष्य करण्यात आले. शिंदे गटाच्या रडारवर उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहीलेले खासदार राजन विचारे आणि त्यांचे समर्थक असतील असे चित्र सुरुवातीला दिसत होते. काही काळानंतर मात्र शिंदे गटाकडून आव्हाडांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे श्रेय घेणे, आव्हाडांच्या निकटवर्तीय नगरसेवकांना गळाला लावणे, मुंब्य्रात आव्हाड विरोधकांना रसद पुरविणे, जुने गुन्हे उकरुन काढणे, आव्हाडांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नाकाबंदी करणे असे उद्योग गेले नऊ-दहा महिने जोरात सुरु आहेत. मुंब्य्रातील एका कार्यक्रमात आव्हाडांवर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि तेथून हा संघर्ष अजून वाढला. गेले नऊ-दहा महिने सुरु असलेल्या या संघर्षातून वाट काढण्याची आयती संधी आव्हाडांना राष्ट्रवादीत झालेल्या बंडानिमीत्त चालून आली होती. मात्र सध्या तरी त्यांनी ती अव्हेरल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… संकटात मदत करणाऱ्या शरद पवारांची साथ सोडून आत्राम मंत्रिपदासाठी अजितदादा सोबत

हेही वाचा… देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत रवानगी?

थोरल्या पवारांची साथ कायम, समर्थक मात्र अस्वस्थ

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणात आव्हाडांचे अजित पवार यांच्याशी कधीच फारसे सख्य राहीलेले नाही. ठाण्यातील एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला आणि आव्हाडांमध्ये गेल्या काही काळापासून दुरावा निर्माण झाला आहे. या मुल्ला यांना अजित पवारांनी मात्र पंखाखाली घेतल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आव्हाडांचा गृहनिर्माण विभागात ठराविक अधिकाऱ्यांसाठी असलेला आग्रह देखील दादांच्या हस्तक्षेपामुळे मोडीत निघाल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणात अजित पवार अस्वस्थ आहेत आणि त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे ही चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरु आहे. दादांच्या बाजूने ज्या आमदारांची नामावळी तयार केली जात होती त्यात सुरुवातीपासूनच आव्हाडांचे नाव घेतले जात नव्हते. तरीही ठाण्यातील सरकारवासापासून मुक्ती मिळविण्यासाठी सत्तेच्या जवळ जावे असा आव्हाडांच्या निकटवर्तीयांचा आग्रह होता. भाजपशी जवळीक साधल्यास मुंब्य्रातील एकगठ्ठा मुस्लिम मते विरोधात जाऊ शकतील अशी भीती असली तरी मागील दोन निवडणूकांमध्ये कळव्यासारख्या हिंदू बहुल भागातही आव्हाडांनी मोठे मताधिक्य घेतले आहे. ही बाब त्यांचे निकटवर्तीय आव्हाडांना सतत पटवून देत होते. मात्र थोरल्या पवारांची साथ सोडायची नाही यावर यंदाही आव्हाड ठाम राहील्याचे पहायला मिळाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhads loyalty to sharad pawar print politics news asj
Show comments