JKF’S Forgotten Crisis :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. खास करुन राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं. तसंच परराष्ट्र धोरणाबाबत एका पुस्तकाचं उदाहरण देत त्यांनी विरोधकांना ते वाचण्याचा सल्ला दिला आहे. नेमकं हे पुस्तकच वाचण्याचा सल्ला मोदींनी का दिला? आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणाबाबत वक्तव्य करताना सांगितलं JKF’S FORGOTTEN CRISIS हे पुस्तक विरोधकांनी वाचलं पाहिजे. परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली काय खेळ सुरु होता ते तुम्हाला समजेल. काही लोकांना वाटतं की जोपर्यंत परराष्ट्र धोरणावर कुणी बोलत नाही तोपर्यंत एखादा नेता, प्रमुख परिपक्व आहे असं मानलं जात नाही. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर बोललं पाहिजे. देशाचं नुकसान झालं तरीही चालेल. मी अशा लोकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला परराष्ट्र धोरण इतकंच जाणून घ्यायचं असेल तर मी सांगतोय ते पुस्तक वाचा. कुठे काय बोलायचं ते तरी जरा तुम्हाला शिकता येईल असं म्हणत मोदींनी या पुस्तकाचा उल्लेख केला.
JKF’S FORGOTTEN CRISIS या पुस्तकाचा केला उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मी सांगतोय त्या पुस्तकाचं नाव JKF’S FORGOTTEN CRISIS आहे. परराष्ट्र धोरणाचा उत्तम अभ्यास असलेल्या माणसाने हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु आणि त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉन एफ केनेडी यांच्यातल्या चर्चेचं सविस्तर वर्णन आहे. देश तेव्हा अनेक आव्हानांना तोंड देत होता पण परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली खेळ चालला होता अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या पुस्तकाचे लेखक ब्रूस रिडेल आहेत.
हे पुस्तक काँघ्रेसला रुचणार नाही असं का आहे?
जॉन एफ केनेडी आणि पंडित नेहरु यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यातल्या चर्चेचा उल्लेख पुस्तकात आहे. तसंच १९६२ या वर्षी जेव्हा भारत आणि चीन यांचं युद्ध झालं तेव्हा देशाची परिस्थिती काय होती? याचाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकात असेही उल्लेख आहेत जे काँग्रेसला मुळीच पटणार नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. फक्त या पुस्तकाचं नाव घेतलं आहे.
या पुस्तकात काय उल्लेख करण्यात आले आहेत?
- JKF’S FORGOTTEN CRISIS या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की जॉन एफ केनेडी आणि त्यांची पत्नी जॅकी केनेडी हे दोघंही जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा केनेडी यांना असं वाटलं होतं की जवाहरलाल नेहरु हे त्यांच्या पत्नीशी म्हणजेच जॅकी केनेडीशी चर्चा करण्यात जास्त रस घेत आहेत.
- पुस्तकात असाही उल्लेख आहे की केनेडी दाम्पत्य जेव्हा भारतात येण्याचं ठरलं तेव्हा अमेरिकेच्या दुतावासाने एक वेगळा व्हिला भाडे तत्त्वावर घेतला होता. मात्र जेव्हा हे दोघं भारतात आले तेव्हा त्यावेळी पंतप्रधान असलेल्या पंडीत नेहरुंनी पंतप्रधान निवास या ठिकाणी असलेल्या एका विशेष कक्षात त्यांची व्यवस्था केली.
- पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की ज्या कक्षाची निवड जॅकी केनेडी यांच्यासाठी करण्यात आली तो खास कक्ष एडविना माउंटबॅटन यांचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एडविना भारत दौऱ्यावर यायच्या तेव्हा याच कक्षात राहात होत्या असा उल्लेख पुस्तकात आहे तसंच एडविना आणि पंडीत नेहरु यांचे संबंध कसे होते याचंही वर्णन पुस्तकात करण्यात आलं आहे.
- JKF’S FORGOTTEN CRISIS या पुस्तकात असा एक दावा करण्यात आला आहे की पंडीत नेहरुंना जॅकी केनेडी यांच्याबाबत आकर्षण वाटू लागलं होतं. तसंच जॉन एफ केनेडी यांची २७ वर्षीय बहीण पॅट केनेडीही पंडीत नेहरुंना खूप आवडत होती, ती दिसायला खूपच आकर्षक होती असाही दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
हे सगळे दावे करण्यात आलेलं हे पुस्तक विरोधकांनी वाचलं पाहिजे असा उल्लेख मोदींनी भाषणात केला आहे. त्यामुळे याचे पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.