अविनाश कवठेकर
सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक साधण्याचे आणि ती वाढविण्याचे कौशल्य अंगी बाळगत आपले साम्राज्य प्रस्थापित करणारे अविनाश भोसले यांची कारकीर्द आश्चर्यकारक अशीच आहे. एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर्स खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाईट हाऊस हा अलिशान बंगला हा अविनाश भोसले यांचा पंचवीस तीस वर्षातील प्रवास थक्क करणारा आहे.
रिक्षाचालक ते हेलिकॉप्टर मालक आणि शिवसेना-भाजपा ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी असा अविनाश भोसले यांचा सर्वव्यापी संचार असायचा. बांधकाम व्यवासायाबरोबरच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही कायम चर्चेत राहिलेले अविनाश भोसले अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून नोकरीच्या शोधात पुण्यात आले. पुण्यात नोकरी न मिळाल्याने रिक्षा चालविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रास्ता पेठ परिसरात त्यांनी भाड्याने घर घेतले आणि रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. रिक्षा व्यवसायात थोडा जम बसल्यानंतर रिक्षा भाड्याने चालविण्यास देण्यास त्यांनी सुरवात केली. त्यातून बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे संबंध आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारी करणाऱ्या काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर रस्ते करण्याची लहान-मोठी कंत्राटे त्यांना मिळाली. पुढे नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांनी जास्त मोठी कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. मात्र सेना-भाजप युतीच्या सत्ताकाळातच त्यांची खरी भरभराट झाली.
युती सरकाराने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग ओलिताखाली आणणे हा महामंडळ स्थापनेचा उद्देश होता. राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक सदस्य तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भोसले यांनी संधान साधून ठेवले होते. त्याचा फायदा त्यांना या महामंडळातील कामे मिळवण्यासाठी झाला. अधिकारी आणि मंत्री यांच्या माध्यमातून अविनाश भोसले यांनी शेकडो कोटींची कंत्राटे घेतली. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक साधण्याच्या कौशल्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट वेगाने झाली. युती सरकारने नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात आले. नव्या सत्ताधाऱ्यांशीही त्यांनी जुळवून घेतले.
कृष्णा खोरे महामंडळातील कोणतेही काम कोणाला द्यायचे, त्या कामाचे पैसे कधी आणि कसे द्यायचे, यावर भोसले यांची नजर असे. कोणत्याही कंत्राटदाराला तेथील काम मिळवण्यासाठी भोसले यांच्या मदतीसाठी याचना करावी लागत असे. काम होवो किंवा न होवो, संबंधित कंत्राटदारास त्याचे बिल अदा करण्यासाठीच्या कागदपत्रावर अविनाश भोसले यांची विशिष्ट खूण असेल, तरच त्या बिलाची रक्कम मिळत असे, असे तेथील अधिकारी सांगत असत. कृष्णा खोरे महामंडळातील सर्वात वजनदार आणि जरब असलेली व्यक्ती म्हणून त्यांचा दबदबा निर्माण झाला होता.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही राज्यातील सिंचन प्रकल्प रखडले असतानाच भोसले यांची संपत्ती मात्र दिवसेंदिवस वाढत होती. बाणेर येथील त्यांचा अलिशान व्हाईट हाऊस हा बंगला आणि तीन हेलिकॉप्टर हा चर्चेचा विषय ठरला. हॅालिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री ॲंजेलिना जोली हिचे पुण्यात चित्रिकरण होणार होते, त्यासाठी शहरातील अनेक पंचतारांकित हॉटेलांपेक्षाही भोसले यांचा अलिशान बंगला तिच्या व्यवस्थापकांनी निवडला. अंजेलिनाचे त्या बंगल्यातील वास्तव्य चर्चेचा विषय झाले होते. त्या बंगल्यातच असलेल्या हेलिपॅडचा वापर शहरात येणारे अनेक बडे राजकीय नेते करतात, ही गोष्टही लपून राहिली नाही. पहिल्यांदा युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अविनाश भोसले यांची गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत झाले. भोसले यांच्या पाचगणी येथील बंगल्यात स्वत: बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आदरातिथ्य स्वीकारले. भोसले यांची ही जवळीकच त्यांच्या कृष्णा खोरे महामंडळातील कारवायांना उपयोगी पडली. यासोबतच कॉंग्रेस आणि राष्ट्रावादीच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते.
परदेशातून ड्युटी चुकवून अनेक वस्तू आणल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सुमारे पाच हजार कोटी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या भोसले यांच्या अविनाश भोसले इन्फ्रास्टक्चर लिमिटेड या कंपनीने आत्तापर्यंत सुमारे ७८ लाख चौरस फुटांचे बांधकाम केले असून गृहसंकुले, व्यावसायिक इमारती, तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि गोवा येथे या कंपनीची हॉटेल्सही आहेत. राजकारण्याशी असलेले संबंध लक्षात घेता, त्यांनी व्यवसायात अल्पावधीत मिळवलेली संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर सीबीआयने कारवाई करून त्यांना गुरुवारी अटक केली. २०१८ मध्ये हजारो कोटी रुपये इतरत्र व्यवहारात आणण्यात आले व त्यासाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आला, असा त्यांच्यावर आरोप आहे.