विरोधी आघाडीच्या ‘इंडिया’ बैठकीसाठी सारे नेते मुंबईत जमत असतानाच, अचानक संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा झाली आणि आघाडीच्या बैठकीचा सारा नूरच पालटला. मोदी यांच्या खेळीने विरोधकांच्या बैठकीची कार्यक्रमपत्रिकाच बदलली.
मुंबईतील बैठक यशस्वी होईल असे चित्र होते. कारण कोणत्याही हेवेदाव्याविना सर्व नेते एकत्र जमले आहेत. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाणार आहे. बैठकीचा विरोधकांमध्ये उत्साह असतानाच, केंद्र सरकारच्या खेळीने विरोधकांचा चर्चेचा रोखच बदलला. १८ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाचा प्रत्येक नेता त्यांच्या परीने अर्थ लावत होता. लोकसभा निवडणुका लवकर घेण्याची ही योजना असल्याचा सार्वत्रिक सूर होता. तसेच एक राष्ट्र, एक निवडणुकीमुळे होणाऱ्या परिणामांची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा – वाय एस शर्मिला यांनी घेतली गांधी कुटुंबाची भेट, YSRTP पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
अदानीच्या संदर्भातील अहवाल इंडिया बैठकीच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्याने विरोधकांना विशेषत: काँग्रेसला आयतीच संधी मिळाली. दिल्लीतून मुंबईत दाखल होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समुहाच्या घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढविला. तसेच मोदी गप्प का, असा सवालही केला. राहुल गांधी यांनी अदानी घोटाळ्याच्या माध्यमातून मोदींना लक्ष्य केल्याने विरोधकांच्या बैठकीला धार आली.
पहिल्या दिवशी अनौपचारिक बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या घोषणेचेच पडसाद उमटले. निवडणूक लवकर घेण्याची मोदी यांची योजना असावी. यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागावे, असा सर्वच नेत्यांचा सूर होता. इंडिया बैठकीची कार्यक्रमपत्रिका भाजपने बदलण्यास भाग पाडल्याची इंडियाच्या नेत्यांची भावना झाली होती. कारण संसदेच्या अधिवेशनामुळे मोदींच्या मनात नक्की काय आहे, याचा अंदाज येत नव्हता. संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख इंडिया बैठकीच्या पहिल्या दिवशीच झाल्याने विरोधी नेत्यांचा सूरच बदलला. विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीतून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.