डॉ. ज्योती मेटेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर बीडची उमेदवारी कोणाला?

विद्यामान आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

jyoti mete joined ncp sharad pawar,
शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे photo : facebook

छत्रपती संभाजीनगर : बीड विधानसभा मतदारसंघावर गेली कित्येक वर्षे क्षीरसागर घराण्याचे वर्चस्व असून, आरक्षणाच्या मुद्यावर ढवळलेले वातावरण पाहता याच मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. नुकताच शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, त्यानंतर बीडची उमेदवारी कोणाला यावरून नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यामान आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. २०१९ च्या बीड विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडूनच पराभव पत्करावा लागला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा निसटता पराभव होण्यापूर्वी त्यांना २०१४ च्या निवडणुकीत शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांनी तुल्यबळ लढत दिली होती. २०१४ च्या निवडणुकीत मेटेंचा निसटता पराभव झालेला असला तरी मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र त्या निवडणुकीतून पुढे आले होते. त्यानंतरही क्षीरसागर घराण्यावर गावागावांमध्ये जाऊन मेटेंकडून चांगलाच प्रहार केला जात होता. त्यातून मराठाबहुल गावातील मराठा समाज मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत एकवटू लागला. पुढे शिवसंग्रामचे पाच सदस्यही जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आले होते. मेटे महायुतीचा घटक पक्ष बनले. विधान परिषदेवरही ते पुन्हा पोहोचले. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीडमधील लढत ही काका-पुतण्यामध्येच रंगली.

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत भाजपविरोधात मित्रपक्ष आक्रमक

दरम्यानच्या पाच वर्षांत जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेचे शिवबंधन बांधूनही झाला. मात्र मागील काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेलाही सोडचिठ्ठी दिली. सध्या त्यांच्या मागे कुठला पक्ष नसला तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर पुन्हा चर्चेत आले आणि त्यांचे नाव पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाशी जोडले जाऊ लागले. दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त भेटी झाल्याचीही चर्चा पसरली होती. आता नुकताच डॉ. ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे बीड मतदारसंघातील मविआच्या उमेदवाराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

संदीप क्षीरसागर यांना उमेदवारीची आशा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही विद्यामान आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्याच पक्षात राहणे पसंत केले असून, लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी केलेल्या कामाची चांगलीच चर्चा रंगली होती. आता डॉ. मेटे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर उमेदवारी कोणाला मिळणार, ही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उमेदवारीबाबत आपण निश्चिंत आहोत. लवकरच यादी प्रसिद्ध होईल. त्यातून उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jyoti mete joined ncp sharad pawar party create speculation over beed seat print politics news zws

First published on: 22-10-2024 at 06:19 IST
Show comments