केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटवर्तीय नेते आणि भाजपाचे शिवपुरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष राकेश कुमार गुप्ता यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी (दि. २६ जून) भव्य मिरवणूक काढून दोन हजार समर्थकांसह त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. २०२० साली ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जे आमदार सरकारमधून फुटून बाहेर पडले होते. त्यापैकी गुप्ता एक नेते होते.
पक्षप्रवेशावेळी राकेश कुमार गुप्ता यांनी हात जोडून काँग्रेस कार्यकर्त्यांची माफी मागितली. ते म्हणाले, “मी पुन्हा घरात परतलो आहे. काँग्रेसने मला नाव, सन्मान आणि नेतृत्व दिले. मी काँग्रेसमध्ये ४० वर्ष काम केले. माझे वडील स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते मृत्यू होईपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते राहिले. मी काँग्रेस परिवाराची माफी मागू इच्छितो, कारण मी मोठी चूक केली होती. यामुळे माझ्या कारकिर्दीलाही डाग लागला. मी याबद्दल तुमची हात जोडून माफी मागतो, मला माफ करा”
राकेश कुमार गुप्ता पुढे म्हणाले, “माझे शरीर जरी भाजपामध्ये गेले असले तरी माझा आत्मा काँग्रेसमध्येच होता. भाजपाने जे आम्हाला सांगितले आणि तिथे गेल्यावर जे दिसले, त्यात खूप फरक होता. पण काँग्रेस पक्ष जे सांगतो, ते करतोच. कमलनाथ यांच्या सरकारने अतिशय कमी कालावधीत खूप काही काम केले. मात्र सरकार गेल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. माझे तन-मन आणि आत्मा काँग्रेस आहे.”
गुप्ता यांच्या घरवापसीमुळे काँग्रेसला मात्र मोठा आनंद झाला आहे. यानिमित्ताने शिवपुरी जिल्ह्यातील व्यापारी समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. गुप्ता यांच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपामध्ये ते अडगळीत फेकले गेले होते. भाजपामध्ये त्यांना यथोचित सन्मान मिळाला नाही. त्यांना केवळ एका जिल्ह्याचे उपाध्यक्ष केले गेले. मात्र इतर कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. त्यांना कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला निमंत्रित केले जात नसे.
मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे अनेक भाजपाचे नेतेही आता काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्याबाबत भाजपाने नाराजी व्यक्त केली. भाजपा नेत्याने सांगितले की, जे भाजपा सोडून जात आहेत, ते लोक स्वतःला असंतुष्ट आणि असुरक्षित समजत होते. जे पक्ष सोडून जात आहे, त्यांना वाटले होते की त्यांना तिकीट दिले जाईल. पण उमेदवारी मिळणे ही एक कठोर प्रक्रिया असते. जे पात्र आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाते. तिकीट मिळवण्यासाठी प्रत्यक्षात उतरून काम करून दाखवावे लागते.
आणखी वाचा >> कर्नाटकची पुनरावृत्ती मध्य प्रदेशमध्ये होणार? राहुल गांधी म्हणतात, आम्ही १५० जागा जिंकू
कटनी जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार ध्रुव प्रताप सिंह यांनीही २३ जून रोजी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्यासोबत मतभेद असल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जाते. मे महिन्यात माजी मंत्री दीपक जोशी यांनी प्रदेश नेतृत्वावर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. दीपक जोशी हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे चिरंजीव आहेत. शिवराज सिंह चौहान सरकारने त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे स्मारक उभारले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
आणखी एक भाजपाचे नेते बैजनाथ सिंह यादव यांनीही सिंधियाशी असलेले नाते तोडून पुन्हा काँग्रेसची वाट धरली. जूनमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावेळी ७०० गाड्यांचा ताफा घेऊन बैजनाथ सिंह काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले होते. यादवेंद्र सिंह यादव यांनीही मार्च माहिन्यात भाजपातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.