BRS Party in Telangana : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आणि गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानंतर बीआरएस पक्ष संघर्षावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, आता बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव पुन्हा एकदा सक्रिय झाले असून ते आता विविध सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत. या बरोबरच हैदराबादमध्ये नुकतीच एक बीआरएसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत के.चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या नेत्यांना संबोधित करत पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. खरं तर के.चंद्रशेखर राव हे पराभवानंतर लोकांपासून दुरावल्याची चर्चा होती.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसला मिळालेल्या अपयशानंतर के.चंद्रशेखर राव हे विधानसभेच्या कामकाजात देखील फारसे सहभागी झाले नव्हते. मात्र, आता तेलंगणातील रेवंत रेड्डी यांच्या काँग्रेस सरकारला कसं आव्हान द्यायचं? तेलंगणात बीआरएस पुन्हा कशा पद्धतीने पुनरागमन करेल? यासाठी के.चंद्रशेखर राव मोठी योजना आखत असल्याची चर्चा आहे. केसीआर यांनी त्यांच्या पक्षाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राज्यातील लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. केसीआर पडद्यामागे सक्रिय होते असं आधी सांगितलं जायचं. पण आता ते काँग्रेस सरकारला आव्हान देण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे बीआरएसच्या कार्यकर्त्यांचेही मनोबल वाढल्याचं सांगितलं जात आहे.

के.चंद्रशेखर राव यांनी बीआरएसच्या सहकाऱ्यांना तळागाळात पक्षाची बांधणी करण्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच तेलंगणातील काँग्रेसच्या राजवटीत देखील बीआरएस जनतेबरोबर कायम उभ असेल यांचं आश्वासन दिलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी म्हटलं की, “पाच तासांची बैठक स्पष्ट रोडमॅपसह झाली आहे. काँग्रेसच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी, ऑटोरिक्षा चालक आणि रिअल इस्टेट व्यावसायिकही अडचणीत आहेत. आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. पण सरकारचं लक्ष त्याकडे दिसत नाही.”

तसेच माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा केटीआर यांनी सांगितलं की, पक्षाच्या आगामी वाटचालीची योजना आखण्यासाठी बीआरएस एप्रिलमध्ये हैदराबादमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केसीआर यांचे पुतणे टी हरीश राव यांच्याकडे ही जाहीर सभा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, बैठकीत घेतलेल्या निर्णयांवरून असं सूचित होतं की बीआरएस आता काँग्रेस सरकारला मोठं आव्हान देण्याच्या तयारीत आहे. उदाहरणार्थ महिलांसाठी ५३ जागा राखीव ठेवण्याचा पक्षाचा निर्णय आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर महिन्यातून एकदा निदर्शने करणे.

दरम्यान, बीआरएस पक्षाच्या एका नेत्याने म्हटलं की, “बीआरएस पक्ष संपल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र,बीआरएस पक्ष संपलेला नाही. आता झालेली बैठक बीआरएससाठी एक नवीन सुरुवात असणार असेल.” या बरोबरच पक्षाच्या नेत्यांसाठी प्रशिक्षण सत्रे, पक्षात फेरबदल, शेतकरी, कामगार, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करणे आणि पक्षाने आपल्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा पुनरुच्चार करणे यासारखे काही इतर निर्णय देखील बीआरएस घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीत गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्यासाठी बीआरएस आतापासून तयारीला लागणार आहे. काँग्रेस सरकारवर निशाणा साधत केटीआर यांनी म्हटलं की, भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे राज्यात प्रत्येकी आठ खासदार आहेत. मात्र, ते सर्व राज्याच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरले आहेत. रेवंत रेड्डी लोकांची दिशाभूल करत आहेत. राज्याच्या आर्थिक स्थितीवर रेवंत रेड्डी यांनी सभागृहात चर्चा घ्यावी”, असं केटीआर यांनी म्हटलं.

Story img Loader