कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी पश्चिम महाराष्ट्रात राजकीय मशागत सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचा विचार घेऊन राजकारण करणारे मुख्यमंत्री राव यांना प्रामुख्याने शेती क्षेत्रातील प्रभावी कार्यकर्त्यांची गरज भासत असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या रूपाने भरपाई झाली आहे. तथापि त्याचा राजकीय फायदा नेमका किती मिळणार यासाठी निवडणूकीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. राव यांच्या हालचाली पाहता त्या महाविकास आघाडीला अडचणीच्या ठरण्याची शक्यता दिसत आहेत.
तेलंगण राज्याच्या निर्मितीचे शिल्पकार के. चंद्रशेखर राव यांनी राज्याचा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करतानाच कृषी विकासाच्या अनेक योजना राबवून त्यांनी शेतकऱ्यांचा कैवारी अशी प्रतिमा निर्माण केली आहे. त्या आधारे तेलंगणा राष्ट्र विकास आघाडी हे पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र विकास आघाडी (बीआरएस) असे नामकरण करून देशभर प्रभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने तेलंगणाच्या उत्तरेस असलेल्या महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिले आहे.
हेही वाचा… वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’चे गणित बिघडवणार?
मराठवाडा, पूर्व विदर्भ येथील दौरे केल्यानंतर आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. आषाढी निमित्त पंढरपूर, सोलापूरची राजकीय वारी करीत राव यांनी या भागात पाय रोवण्याचे प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल हे त्यांच्या सोबत राहिले. आता चंद्रशेखर राव यांनी कोल्हापूर- सांगली जिल्ह्यावर नजर रोखली आहे. वाहनांचा भलामोठा ताफा दिमतीला घेऊन त्यांनी दोन जिल्ह्यात त्यांनी शक्तिप्रदर्शन करून शेतकरी सरकारची श्रीमंती पदोपदी दाखवून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
हेही वाचा… शेकापसमोर अस्तित्वाचा प्रश्न, पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन
रघुनाथदादांचा नवा घरोबा
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी या दौऱ्याचे निमित्त साधून आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करीत असल्याचे घोषणा केली. नवा राजकीय घरोबा केल्यानंतर पाटील यांनी ‘ देश व राज्य पातळीवरील भाजपचे सरकार लुटारूंचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये शेतकरी विकासासाठी आमुलाग्र कार्य केले आहे. तेलंगणातील धोरणामुळे आमची आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हि भूमिका प्रत्यक्षात उतरू शकेल. यासाठी या पक्षात प्रवेश केला आहे. क्रांती दिनी भव्य शेतकरी मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली जाणार आहे,’ अशा शब्दांत युक्तिवाद केला आहे. तर चंद्रशेखर राव यांनी रघुनाथदादा पाटील हे राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी प्रश्नासाठी लढणारे लढाऊ नेतृत्व आहे. ते पक्षात आल्याने ताकद वाढली आहे, असे म्हणत त्यांना ताकद पुरववायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा… काँग्रेसचे ओबीसी समाजाला बळ, प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते दोन्ही समाजाकडे
कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातील बीआरएसचे निवडणुकीचे राजकारणही चर्चेत आले आहे. रघुनाथदादा पाटील यांना हातकनंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उतरवले जाणार आहे. यापूर्वी या मतदारसंघात त्यांनी शिवसेना व आम आदमी पार्टी यांच्याकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये यशाने हुलकावणी दिली. आता शेतकऱ्यांचाच पक्ष आणि चिन्ह घेऊन ते उतरत असताना त्यांचा सामना शेतकरी नेते राजू शेट्टी आणि मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांच्याशी होणार आहे. पाटील आणि सदाभाऊ खोत हे एकेकाळचे सहकारी शेट्टी यांच्या विरोधात आरोळी ठोकतील असे दिसत आहे. बीआरएस कडून सांगलीमध्ये मल्ल चंद्रहार पाटील यांना आखाड्यात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. २०१४ मध्ये एमआयएम, २०१९ मध्ये वंचित आणि एमआयएम असा प्रयोग केल्याने त्याचा दणका उभय काँग्रेसला बसला होता. आता बीआरएस मुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतांचे विभाजन करण्याचे ही खेळी लक्षात आल्याने यावेळी या नीतीचा फारसा प्रभाव पडला जाणार नाही, असाही चर्चेचा दुसरा प्रवाह आहे.
हेही वाचा… वर्षां गायकवाड यांच्या मागणीवर सुशीलकुमार शिंदे यांचे मौन
कोल्हापूरमध्ये पूर्वी जनसुराज्य व काँग्रेसमध्ये काम केलेले संजय पाटील यांच्याकडे बीआरएसचे जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. त्यांनी कोल्हापूर लोकसभा लढवण्याचा निर्धार केला आहे. या निमित्ताने बीआरएसचा प्रभाव कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दिसू लागला असला तरी पक्षाकडे अजून ताकतीचा नेता दिसत नाही ही मोठी उणीव आहे.
बेरीज आणि वजाबाकी
रघुनाथ पाटील हे १६ राज्यातील कार्यरत शेतकरी संघटना ‘शिफा’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद जोशी यांचे विचार शिरोधार्य मानून ही संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या सदस्य संघटनांना बीआरएस सोबत आणण्याचे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास चंद्रशेखरराव यांच्या मागे बळीराजाची मोठी ताकद उभी राहू शकते. हे बेरजेचे राजकारण होत असताना तिकडे माजी खासदार धर्मण्णा सादूल हे अवघ्या महिन्याभरात बीआरएसला रामराम ठोकून स्वगृही कॉंग्रेस पक्षात परतण्याच्या विचारात असल्याने वजाबाकी होताना दिसत आहे.