दिल्लीमध्ये अबकारी कर अंमलबजावणी धोरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय. या आरोपाप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापेमारी केल्यानंतर या प्रकरणाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, अबकारी कर अंमलबजावणी धोरण कथित गैरव्यवराहामध्ये तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी तथा विधान परिषदेच्या सदस्या के. कविता यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे हा आरोप तेलंगाणामधील भाजपाच्या नेत्यांनी नव्हे तर दिल्लीमधील भाजपा नेत्यांनी के. कविता यांचे नाव घेतले आहे.
हेही वाचा >> “’आप’ फोडा आणि आमच्यासोबत या”; भाजपाने ऑफर दिल्याचा मनिष सिसोदियांचा दावा
भाजपाने के. कविता यांच्यावर काय आरोप केला आहे?
रविवारी अबकारी कर अंमलबजावणी धोरण गैरव्यवहारप्रकरणी बोलताना भाजपाने आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल तसेच मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर टीका केली. यावेळी भाजपाचे खासदार परवेश वर्मा आणि भाजपाचे माजी आमदार मनजिंदर सारसा यांनी के. कविता यांचे नाव घेतले. के. कविता यांनी दिल्लीचे मद्य धोरण सुलभ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. कविता यांनी सिसोदिया यांना हैदरबादमधील अरुण रामचंद्रन पिलाई यांच्यासह अनेक मद्यनिर्मिती कंपन्यांच्या मालकांना भेटण्यास मदत केली, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. या कथित गैरव्यवहारामध्ये सिसोदिया यांच्यासह हैदराबादमधील अरुण पिलाई यांची नावे आहेत. दिल्लीमध्ये जसे मद्य विक्री धोरण आहे, अगदी तशाच पद्धतीचे धोरण तेलंगाणा आणि पश्चिम बंगालमध्ये असल्याचा आरोपही भाजपाच्या या नेत्यांनी केला आहे.
हेही वाचा >> “मनीष सिसोदियांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा, पण..,” सीबीआयच्या छापेमारीनंतर अरविंद केजरीवाल यांचे मोठे विधान
भाजपाने हे आरोप केल्यानंतर के. कविता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. केंद्र सरकारकडे सर्व तपाससंस्था आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. हे सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल,” असे के. कविता म्हणाल्या. तसेच “भाजपा माझे वडील (के. चंद्रशेखर राव) यांच्या लोकप्रियतेला घाबरत आहे. ते भाजपावर सातत्याने टीका करतात. आमचे कुटुंब लढाऊ आहे, हे ते विसरले आहेत. आम्ही तेलंगाणासाठी संघर्ष केला आहे. आम्ही लढाईत मागे हटणार नाही,” असा इशारादेखील त्यांनी भाजपाला दिला.
दरम्यान, भाजपाच्या दिल्लीमधील नेत्यांनी के. कविता यांचे नाव घेतल्यानंतर तेलंगाणामधील भाजपाच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. येथील भाजपाचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. दिल्लीमधील भाजपाचे नेते नेमकं काय म्हणाले याबद्दल मला निश्चित माहिती नाही. मी याची अधिक माहिती घेणार आहे,” असे कुमार यांनी माध्यमांना सांगितले.