तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचा विस्तार करू पाहात आहेत. राष्ट्रीय राजकारणात येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान त्यांनी आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. मागील काही महिन्यांपासून ते मराठवाडा, विदर्भ या भागात सभा, बैठका घेत आहेत. नागपुरात भारत राष्ट्र समितीचे कार्यालयही उभारण्यात आले. त्यांनी सोलापूरमधील पंढरपुरात येत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. याच कारणामुळे आगामी काळात के. चंद्रशेखर राव यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात कोणत्या राजकीय पक्षांना फटका बसणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केसीआर यांचा तब्बल ६०० वाहनांचा ताफा

के. चंद्रशेखर राव सोमवारी (२६ जून) विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी सोलापूरमध्ये आले होते. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ते आपले मंत्री, आमदार, पक्षाचे नेते तसेच असंख्य पदाधिकाऱ्यांसह तब्बल ६०० वाहनांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले होते. मंगळवारी (२७ जून) त्यांनी आपले समर्थक तसेच नेत्यांसह विठुरायाचे दर्शन घेतले. आमची हा राजकीय दौरा नव्हता, असे बीआरएसकडून सांगण्यात आले आहे. मात्र तब्बल ६०० वाहनांचा ताफा घेऊन आलेल्या के. चंद्रशेखर राव यांचा या दौऱ्यामागचा राजकीय हेतू लपून राहलेला नाही.

केसीआर यांनी वारीची निवड का केली?

पंढरपूरच्या वारीकडे केसीआर यांनी जनसंपर्काची उत्तम संधी म्हणून पाहिले आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यात महाराष्ट्रातील वारकरी पंढरपुराकडे प्रस्थान करतात. महिनाभराच्या या प्रवासाला वारी म्हटले जाते. वारीमध्ये ग्रामीण भागातील लाखो विठ्ठल भक्तांचा समावेश असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी हे वारकरी पंढपुरात दाखल होतात. विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे बहुतांश वारकरी हे ग्रामीण भगातील असतात. शेतकरी खरीप हंगामातील पेरणी करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढपूरकडे प्रस्थान करतात. या काळात वेगवेगळी विचारसरणी असणारे सर्वपक्षीय नेतेमंडळी वारीमध्ये वारकऱ्यांची जमेल त्या पद्धतीने मदत करत असतात. काही नेते तर वारकऱ्यांसोबत चालतानाही दिसतात. आषढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. वारीचे हेच महत्त्व के. चंदशेखर राव यांनी ओळखले असावे. म्हणूनच त्यांनी शक्तीप्रदर्शन तसेच जनसंपर्क वाढवण्यासाठी वारीची निवड केली.

केसीआर यांचा नारा ‘अबकी बार शेतकरी सरकार’

महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी केसीआर यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. याच कारणामुळे केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाकडून ‘अबकी बार शेतकरी सरकार’ असा प्रचार केला जात आहे. विदर्भ आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्टात पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी केसीआर विशेष प्रयत्न करत आहेत. ते महाराष्ट्रात ‘तेलंगणा मॉडेल’ राबवू पाहात आहेत. महाराष्ट्रातील ४५ हजार गावांमध्ये पक्षाचे जाळे निर्माण करण्यासाठी केसीआर यांनी साधारण महिन्याभराचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

के. चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यावर भाजपा, शिवसेना (शिंदे गट), तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गटाने केसीआर यांचे स्वागत केले आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केसीआर यांच्या पक्षविस्ताराच्या मोहिमेवर टीका केली आहे.

“आंध्र प्रदेशचे मंत्री असताना तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री असताना केसीआर यांनी मागील आठ ते नऊ वर्षांत एकदाही पंढरपूरला भेट दिलेली नाही. केसीआर हे माझे मित्र आहेत. मात्र आपण कोणाविरोधात लढत आहोत, हे अगोदर त्यांनी ठरवायला हवे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बीआरएस ही भाजपाची बी टीम आहे, असा आरोप केला. “बीआरएस ही भाजपाची बी टीम आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी केसीआर यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आले आहे. मात्र मतांचे विभाजन होणार नाही. महाराष्ट्रातील लोकांनी भाजपाचा छुपा अजेंडा ओळखलेला आहे,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K chandrashekar rao visited pandharpur vitthal temple trying to expand brs party in maharashtra prd
Show comments